हातगेघर प्रकल्पातील लाभार्थी भूखंडाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:29 AM2021-07-17T04:29:42+5:302021-07-17T04:29:42+5:30
पाचगणी : महू-हातगेघर प्रकल्पातील हातगेघर येथील बुडीत लाभार्थ्यांना शासनाने गावठाण भूखंड जिल्ह्यातील फलटण शहरालगत कोळकीमध्ये तर ग्रामीणला बरड ...
पाचगणी : महू-हातगेघर प्रकल्पातील हातगेघर येथील बुडीत लाभार्थ्यांना शासनाने गावठाण भूखंड जिल्ह्यातील फलटण शहरालगत कोळकीमध्ये तर ग्रामीणला बरड या ठिकाणी मंजूर केले आहेत. मात्र, या भूखंडाचा प्रत्यक्ष ताबा अजून मिळालाच नसताना, दलाल मात्र भूखंडधारकांच्या दारात येऊन विक्रीसाठी गळ घालत आहेत, तर प्रशासन मागणी अर्जाच्या नावाखाली लाभार्थ्यांना गेल्या २३ वर्षांपासून झुलवत असल्याचे चित्र निदर्शनास येते आहे. यात दलाल मालामाल तर लाभार्थी बेहाल होत आहेत. उर्वरित लाभार्थी भूखंडाच्या प्रतीक्षेत, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
महू-हातगेघर प्रकल्प होऊन २३ वर्षे झाली आहेत. यामधील अनेक बुडीत प्रकल्पधारकांना भूखंड मंजूर होऊन वाटप झाले. मात्र, हातगेघर प्रकल्पातील बुडीत लाभार्थ्यांना फलटण शहरालगत कोळकी हद्दीत भूखंड मंजूर होऊन २३ वर्षे उलटली, तरी अजूनही भूखंडाविनाच राहिले आहेत. आजतागायत त्यांना भूखंड दाखविलेही नाहीत. फक्त कोळकीमध्ये भूखंड मंजूर झालेत, एवढेच लाभार्थ्यांना माहीत आहे, तर कोळकी शहरालगत असल्याने त्यास सोन्याचा भाव येत आहे. फलटणमधील दलाल सध्या बुडीत भूखंडधारकांच्या शोधार्थ येत आहेत. स्थानिक दलालांमार्फत बुडीत लाभार्थ्यांना गाठून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी भूखंड कवडीमोल किमतीत लाटत आहेत.
काही बुडीत लाभार्थी भूखंड मिळविण्यासाठी प्रत्यक्ष सातारा येथील प्रांताधिकारी कार्यालयात हेलपाटे मारीत आहेत. त्यांना माहितीच दिली जात नाही, तरी शासनाने अशा बुडीत लाभार्थ्यांना त्यांच्या भूखंडाचे सरसकट वाटप करून दलालांच्या तावडीतून सोडवावे. अगोदरच आम्ही लाभार्थी जमीन धरणात गेल्याने बेघर झाले आहेत. आम्हाला पुन्हा उघड्यावर येण्यापासून वाचवावे, अशी हाक उर्वरित राहिलेले बुडीत लाभार्थी करीत आहेत.
महू-हातगेघर प्रकल्पातील हातगेघर येथील लाभार्थ्यांना शासनाने भूखंड मागणी करण्याकरिता पत्रव्यवहार केला आहे, परंतु भूखंड क्रमांकच दिले नसल्याने, कोणत्या भूखंडाची मागणी प्रतिज्ञापत्रद्वारे कोणत्या भूखंड करायची, असा प्रश्न लाभार्थ्यांच्या पुढे उभा आहे, तर धरणग्रस्तांचे प्रश्न कधीच व्यवस्थित हाताळले नाहीत. त्यामुळेच आज या लाभार्थ्यांवर ही वेळ आली आहे.
चौकट:-
यांना आजपर्यंत भूखंड ताब्यात नाही...
आनंदा मारुती पार्टे, चंद्रकांत मारुती पार्टे, नारायण मारुती पार्टे, चंद्रकांत नारायण मानकुमरे, मंदा नामदेव मानकुमरे, दिलीप नारायण मानकुमरे या बुडीत लाभार्थ्यांनी २०१८ व मार्च २१ मध्ये मागणी अर्ज केले आहेत. आजपर्यंत त्यांना मंजूर भूखंड ताब्यात मिळाले नाहीत.
(कोट)
प्रशासनाने आमचा अंत पाहू नये, अगोदरच आमची धरणामुळे वाताहात झाली आहे. आता भूखंडासाठी शासन मागणी अर्जाचे निमित्त पुढे करीत नाहक त्रास दिला जात आहे. आता हे थांबवून सरसकट वाटप करावे.
- दिलीप मानकुमरे, बुडीत लाभार्थी हातगेघर, ता.जावळी.
कोट..
मंजूर भूखंड काही मोजक्याच लाभार्थ्यांना वाटले. त्यानंतर, वाटप बंद झाल्याचे सांगून दोन वर्षांपूर्वी पुन्हा वशिलेबाजीने थोड्या लाभार्थ्यांना वाटप करून भूखंड देणं थांबविले. आता मात्र शासनाने त्यांना अंतिम नोटीस देऊन २७ जुलैपर्यंत मागणी अर्ज करण्यास मुदत दिली आहे, तर प्रशासनाने या लाभार्थ्यांस सरसकट भूखंड वाटप करावे.
- संदीप गोळे, समाजसेवक, हातगेघर