‘डॉल्बीमुक्ती’मुळे वीस लाखांचा लाभ
By Admin | Published: September 20, 2015 08:56 PM2015-09-20T20:56:52+5:302015-09-20T23:46:07+5:30
वाठार स्टेशन पोलीस ठाणे हद्द : ४७ पैकी २३ गावांत ‘एक गाव एक गणपती’
वाठार स्टेशन : ध्वनी प्रदूषण, गोंगाट, व्यसनाधीनता व गणेश मंडळांचे होणारे आर्थिक नुकसान रोखण्यासाठी जिल्ह्यात डॉल्बीमुक्तीचा ऐतिहासिक गजर झाला. त्यासाठी ‘लोकमत’ ने पुढाकार घेऊन ही चळवळ गावोगावी वाडी-वस्तीपर्यंत पोहोचवली. त्यास पोलीस प्रशासनानेही पाठबळ दिल्याने जिल्ह्यासह कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील वाठार पोलीस ठाण्याअंतर्गत ४७ गावांपैकी आत्तापर्यंत २३ गावांनी डॉल्बीला हद्दपार करण्याचा निर्धार केला आहे. या माध्यमातून या गावातील या मंडळांची जवळपास वीस लाखांची बचत होणार आहे.कोरेगाव तालुक्यातील वाठार पोलिसांच्या आवाहानानंतर या पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात जाऊन वाठार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी गणेश मंडळांचे पदाधिकारी व ग्रामस्थांना डॉल्बी बंदीबाबतची जागृती केली. यास जवळपास २३ गावांतील गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद देत डॉल्बीबंदीची घोषणा केली. ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमात सहभाग नोंदवला.
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील २३ गावांनी आत्तापर्यंत ‘एक गाव एक गणपती’ बसवण्याचा तर उर्वरित २४ गावांतील ८८ गणेश मंडळांनी अशा एकूण १११ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमूर्ती बसण्याचा संकल्प केला आहे. यावर्षी २३ गावांसाठी वाठार पोलीस ठाण्याच्या वतीने ‘गणराया अॅवॉर्ड’ देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तसेच उत्कृष्ट समाज प्रबोधनात्मक देखाव्यासाठी विषेश पुरस्कार देण्यात येणार आहेत.
यावर्षी दुष्काळी परस्थिती असल्यामुळे गणेश मंडळांना आर्थिक टंचाई भासणार आहे. परंतु डॉल्बीबंदी केल्यामुळे या मंडळाचे बजेट कमी होणार आहे. प्रत्येक वर्षी डॉल्बी, डीजेसारख्या ध्वनी प्रदूषण करणाऱ्या यंत्रणेवर वीस लाखांहून अधिक रक्कम खर्ची पडत होती.
साधारण डॉल्बी वाजवण्यासाठी तीस हजारांपासून ५० हजारांपर्यंतचा खर्च एका मंडळास करावा लागत होता.
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात डॉल्बीमुळे केवळ गोंगाट नव्हे, तर भांडण, तंट्यापासून ही मुक्ती मिळणार आहे. नाचण्याच्या कारणावरून गणेश मंडळातील कार्यकर्त्यांचे वादही थांबणार आहेत. यातून होणाऱ्या पैशाच्या बचतीमधून मंडळांनी सामाजिक जबाबदारी म्हणून शाळकरी मुलांना शालेय साहित्य वाटप करावे. तसेच दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक निकम यांनी केले आहे. (वार्ताहर)
उल्लंघन झाल्यास कारवाई...
वाठार पोलीस ठाण्याअंतर्गत आत्तापर्यंत २३ गावांतील गणेश मंडळांनी डॉल्बीबंदीला हिरवा कंदील दाखविला आहे. उर्वरित गावांतील मंडळांनाही पोलिसांच्या वतीने डॉल्बी बंदीबाबत आवाहन करण्यात आले आहे. डॉल्बी वाजवण्याबाबत जी आवाजाची क्षमता ठरवून दिली आहे. त्याचे उल्लंघन मंडळाकडून झाल्यास योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
- शहाजी निकम, सहायक पोलीस निरीक्षक