विविध आधारकार्डचा वापर करुन लाडकी बहीण योजनेचा लाभ! ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

By नितीन काळेल | Published: September 3, 2024 10:19 PM2024-09-03T22:19:31+5:302024-09-03T22:20:20+5:30

त्रिसदस्यीय समिती; संबंधितांवर गुन्हा नोंद

benefit of ladki bahin yojana using various aadhaar card take a note of the report of lokmat by the administration | विविध आधारकार्डचा वापर करुन लाडकी बहीण योजनेचा लाभ! ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

विविध आधारकार्डचा वापर करुन लाडकी बहीण योजनेचा लाभ! ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सातारा जिल्ह्यातून एका महिलेच्या नावाच्या विविध आधारकार्डचा वापर करुन अर्ज भरण्यात आल्याची माहिती ’लोकमत’मध्ये प्रसिध्द होताच जिल्हा प्रशासनाने याची तातडीने दखल घेतली. तसेच त्रिसदस्यीय समिती गठीत केली असून त्याचा चाैकशी अहवालही प्राप्त झाला आहे. या अनुषंगाने संबंधितांवर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रशासनाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली. त्यानुसार राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या अंतर्गत पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळत आहेत. या अनुषंगाने ‘लोकमत’च्या दि. ३ सप्टेंबरच्या अंकात एका महिलेचे आधारकार्ड वापरुन सातारा जिल्ह्यात ३० अर्ज भरल्याचे वृत्त प्रसिध्द झाले होते. याबाबत पनवेल तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आलेली. यानंतर जिल्हा प्रशासनाने याची तातडीने दखल घेतली. तसेच तपासणी केली असता योजनेच्या पोर्टलवर जिल्ह्यातील प्रतीक्षा पोपट जाधव (रा. मायणी, ता. खटाव) या महिलेच्या नावाच्या वेगवेगळ्या आधार कार्डचा वापर करुन अर्ज भरण्यात आल्याचे दिसून आले. तसेच पोर्टलवर एकूण २८ अर्जांची माहिती प्राप्त झाली. तरीही योजनेसाठी एकूण किती अर्ज भरण्यात आलेले आहेत, याबाबत माहिती घेण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने त्रिसदस्यीय समिती गठीत केली.

या त्रिसदस्यीय समितीत जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय तावरे, बॅंक आॅफ महाराष्ट्रचे लीड बॅंक मॅनेजर नितीन तळपे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. एकूण २८ अर्ज छाननीत निदर्शनास आलेले आहेत. या सर्व २८ अर्जामध्ये एकच नाव आहे व सर्व कागदपत्रे, आधारकार्ड आदी कागदपत्रे ही एकच आहेत. तसेच अर्ज भरताना विविध आधारकार्ड क्रमांकाचा वापर करण्यात आल्याचेही दिसून आलेले आहे. तर दि. २९ आॅगस्ट रोजी तीन हजार रुपयेच जमा झाल्याचे दिसून आले आहेत, असेही पत्रकात स्पष्ट करण्यात आलेले आहे.

चाैकशी समितीचा अहवाल प्राप्त...

जिल्हा प्रशासनाने समिती गठीत केल्यानंतर सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याची सूचना करण्यात आलेली. त्यानुसार संबंधितांचे जाबजबाब नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच यामध्ये महिलेला पतीनेही मदत केल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. याबाबतच्या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. याप्रकरणी संबंधित महिला आणि तिच्या पतीच्याविरोधात वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, अशी माहितीही प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेली आहे.

 

Web Title: benefit of ladki bahin yojana using various aadhaar card take a note of the report of lokmat by the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.