साताऱ्याला उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कार, जूनमध्ये दिल्लीत होणार पुरस्कार वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 06:26 PM2022-05-24T18:26:54+5:302022-05-24T18:27:15+5:30
केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या २०२०-२१ च्या पुरस्कार स्पर्धेत साताऱ्यासह देशातील ३३६ जिल्ह्यांनी सहभाग घेऊन आराखडा सादर केला होता
सातारा : केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाद्वारे आयोजित स्पर्धेत सातारा जिल्ह्याला २०२०-२१ चा उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा ९ जून रोजी दिल्ली येथे होणार आहे.
केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या २०२०-२१ च्या पुरस्कार स्पर्धेत साताऱ्यासह देशातील ३३६ जिल्ह्यांनी सहभाग घेऊन आराखडा सादर केला होता. त्यातून प्राथमिक स्तरावर ३० जिल्ह्यांची केंद्रीय समितीसमोर सादरीकरणासाठी निवड झाली होती. यामध्ये महाराष्ट्रातून सातारा जिल्ह्याचा समावेश होता.
जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनील पवार व सहकाऱ्यांनी या आराखड्याचे १९ जानेवारी रोजी केंद्रीय समितीसमोर ऑनलाईन सादरीकरण केले होते.
२०२०-२१ च्या आराखड्यात विशेष कामगिरी म्हणजे कोरोनाच्या साथीमध्ये आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळाचा अभाव दूर करण्यासाठी विभागाने मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, कस्टमाईज क्रॅश कोर्स फॉर कोविड वॉरिअर्स, संकल्प अंतर्गत १ हजार ३५ उमेदवारांना ॲडव्हान्स अँड बेसिक हेल्थकेअर सपोर्ट, जनरल ड्युटी असिस्टंट व ऑक्सिजन प्लांट मेंटेनन्स या कोर्सचे प्रशिक्षण जिल्ह्यातील १७ नामांकित हॉस्पिटलद्वारे देण्यात आले होते.
तसेच कोरोना काळात युवक-युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी ५ ऑनलाईन मेळावे घेण्यात आले. यामधून १ हजार ५४ उमेदवारांची अंतिम निवड झाली होती. याबरोबरच विविध विषयांवर ऑनलाईन समुपदेशन व मार्गदर्शनाचे १५ कार्यक्रमही आयोजित केले होते.
कोरोना काळात कुटुंबातील सदस्य गमावलेल्या १७ इच्छुक उमेदवारांना प्राधान्य देऊन कौशल्य प्रशिक्षण देण्याचे कामही सुरू आहे. तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या २३८ उमेदवारांना आर्थिक साहाय्य करण्यात आले. तसेच प्रशिक्षणासाठी विविध क्षेत्रातील दर्जेदार संस्थांची स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे.
दिल्लीत पुरस्कार वितरण...
दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटर येथे ९ जून रोजी केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनील पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे.