स्टॉकिस्ट नेमण्याच्या आमिषाने साडेचार लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2016 01:12 AM2016-02-02T01:12:34+5:302016-02-02T01:12:34+5:30
गुन्हा दाखल : कोल्हापूरच्या संशयिताविरुद्ध फिर्याद
सातारा : पुस्तकांसाठी स्टॉकिस्ट नेमायचे आहेत, अशी जाहिरात देऊन जिल्ह्यातील अनेकांकडून पैसे घेणाऱ्याविरुद्ध आठ जणांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ‘विशाल ग्रुप’ या नावाने ही रक्कम घेण्यात आली असून, कंपनीचे साताऱ्यातील कार्यालय बंद झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
विशाल शंकर ओंबळे (वय २६, रा. बोंडारवाडी-केडांबे, ता. जावळी) यांच्यासह आठ जणांनी ही फिर्याद दिली आहे. विशाल विजय माने (रा. शिंपे रस्त्याजवळ, सरुड-कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे. ‘पुस्तकांच्या व्यवसायासाठी स्टॉकिस्ट नेमणे आहेत,’ अशा आशयाची जाहिरात त्याने दिली होती. दि. २ नोव्हेंबर २०१५ ते २९ जानेवारीअखेर अनेकांकडून अनामत म्हणून रक्कम घेण्यात आली.
मात्र, दि. २९ जानेवारी रोजी कंपनीशी शेवटचा संपर्क झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर संबंधिताचा फोन उचलला जात नव्हता. पोवई नाक्यावरील उद्योग भवन येथील कंपनीच्या कार्यालयात त्यानंतर संपर्क साधला असता, चार-पाच दिवसांपासून जले. त्यानंतर ओंबळे व इतरांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. विशाल ओंबाळे यांच्याकडून ९५ हजार, तर सचिन मारुती हंबीर (रा. फलटण), उमेश श्रीरंग चिकणे (रा. तळोशी-केडंबे), महेश दिलीप सावंत (रा. धामणी, ता. पाटण), रियाज बरकत आतार (रा. ढेबेवाडी, ता. पाटण), अनिकेत प्रदीप मुसळे (रा. बावधन, ता. वाई), शेखर संभाजी क्षीरसागर (रा. रविवार पेठ, सातारा) आणि शशिकांत गोविंद साळुंखे (रा. सातारा) या सात जणांकडून प्रत्येकी पन्नास हजार रुपये कंपनीने घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
घसघशीत कमिशनचे गाजर
पुस्तकांसाठी स्टॉकिस्ट म्हणून नेमणूक होण्यासाठी एक लाख रुपये अनामत रक्कम भरावी लागेल, असे सांगितले गेले होते. सोळा टक्के एवढ्या घसघशीत कमिशनचे गाजर दाखविण्यात आले होते. ओंबळे यांच्यासह इतरांनी प्रथम पन्नास हजार रुपये भरले. नंतर ओंबळे यांनी संपर्क साधला असता सातारा कार्यालयात त्यांनी ४५ हजार रुपये भरले. त्यावेळी त्यांच्या नावे करारनामा करण्यात आला. मात्र, ९ जानेवारीपासून त्यांच्यासह कुणाचाही फोन उचलला गेला नाही. कार्यालयही अनेक दिवस बंद दिसल्याने अनामत रक्कम भरणाऱ्यांचे धाबे दणाणले.