काळ्या पैशाची समांतर व्यवस्था मोडीत
By admin | Published: January 2, 2017 11:18 PM2017-01-02T23:18:12+5:302017-01-02T23:18:12+5:30
सदाभाऊ खोत : बदल स्वीकारा; चांगल्या गोष्टीसाठी धाडसी निर्णय घ्यावा लागला
मलकापूर : ‘वाळूसारख्या अवैध धंद्यातून काळ्या पैशाची एक समांतर व्यवस्था निर्माण झाली होती. त्यामुळे अर्थकारण, राजकारण व समाजकारण दूषित झाले होते. अशी काळ्या पैशाची व्यवस्था नोटाबंदीच्या निर्णयामुळे मोडीत निघाली. बदल हा निसर्गाचा नियम असून, तो स्वीकारला पाहिजे,’ असे मत जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
मलकापूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, रयत कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, उपाध्यक्ष विजय मुठेकर, दयानंद पाटील, प्रदीप पाटील, महादेव देसाई, आनंदराव मोहिते, उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
मंत्री खोत म्हणाले, ‘एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी धाडसी निर्णय घ्यावे लागतात. नोटाबंदीमुळे घरात साठवून ठेवलेला पैसा अनेक मार्गातून बँकेत जमा झाला. तो पैसा मुख्य प्रवाहात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला कर्जे उपलब्ध होऊन उद्योग वाढीस चालना मिळेल. व्यवहारात बदल होण्यासाठी एटीएम, डेबिट कार्ड, कॅशलेस मशीन व मोबाईल बँकिंगचा अवलंब केला पाहिजे. जनावरांमागे जाणारी व न शिकलेली मुलेसुद्धा मोबाईलवर सहज काहीही करतात. त्यामुळे अशक्य असे काहीच नाही. वेळ लागेल; पण हा बदल हळूहळू पचनी पडत आहे.
गरीब शेतकऱ्यांना काहीच अडचण नाही. ज्या बँका, संस्था नियमानुसार चालतात त्यांना काहीच अडचण येणार नाही. एका रात्रीत साडेतीनशे कोटी रुपये नाशिकच्या जिल्हा बँकेत जमा झाले. त्यामुळेच त्यांना निर्बंध आले. नोटाबंदी हे औषध आहे तर कॅशलेस व्यवहार पद्धती हा बदल आहे. त्यामुळे जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी बदलाचा स्वीकार प्रत्येकाला करावाच लागणार
आहे.’
यावेळी विलासराव पाटील-उंडाळकर यांचेही भाषण
झाले. (वार्ताहर)