फेसबुकवर अनोळखी सुंदरीने चॅटिंग केल्यास सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:27 AM2021-06-11T04:27:15+5:302021-06-11T04:27:15+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात हनी ट्रॅपचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. अनेक जण समाजात बदनामी होईल, म्हणून पोलिसांकडे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात हनी ट्रॅपचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. अनेक जण समाजात बदनामी होईल, म्हणून पोलिसांकडे तक्रार करीत नाहीत. याचाच गैरफायदा घेऊन हनी ट्रॅपमधील टोळके बेमालुमपणे खंडणी वसूल करीत असते. असे प्रकार टाळण्यासाठी सोशल मीडियाचा सावधगिरीने वापर करणे गरजेचे आहे. अनोळखी युवतीने चॅटिंग केल्यास मोहात अडकून आयुष्य पणाला लावू नका, असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात येतेय.
जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी साताऱ्यात एका डाॅक्टरला आणि सैन्य दलातील एका जवानाला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढण्यात आले होते. या प्रकारानंतर पोलिसांनी संबंधित महिलांना अटक केली होती. तसेच फलटण येथील एका प्रसिद्ध व्यापाऱ्यालाही एका युवतीने आपल्या जाळ्यात ओढले होते. अशा प्रकारच्या घटना सातारा जिल्ह्यात सातत्याने घडत आहेत. मात्र, डोक्यावरून पाणी गेल्यानंतरच तक्रारदार पुढे येत आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी शहराच्या उपनगरात असाच एक प्रकार घडला. पत्नी माहेरी गेल्यानंतर युवकाने फेसबुकवर एका युवतीशी चॅटिंग सुरू केले. त्यानंतर त्या युवतीने त्याला अश्लील फोटोही पाठवले. ते फोटो पाहून युवक भुलला. दरम्यान, त्या युवतीने त्याचे चॅटिंग आणि त्याचा फोटो माॅर्फ करून त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याचे डोळे खाडकन् उघडले. पण, वेळ निघून गेली होती. पोलिसात आल्यानंतर त्याला तक्रारीसाठी बरेच हेलपाटे मारावे लागले.
फेसबुकवर अशी
झाली फसवणूक
एका युवकाला मुलीची फेसबुकवर फ्रेंडरिक्वेस्ट आली. त्या युवकाने ती मुलगी अनोळखी असतानाही रिक्वेस्ट स्वीकारली. काही दिवसांत दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. मुलीने त्या चॅटिंगचा आधार घेऊन त्याला ब्लॅकमेल सुरू केले. तेव्हा युवक पोलिसात आला.
अलिशान गाडीही गेली
फलटण येथील एका व्यापाऱ्याला एका युवतीने हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढले. ठोसेघर परिसरात नेऊन त्या व्यापाऱ्याला लुटण्यात आले. त्याची अलिशान कार आणि दागिने घेऊन युवतीसह साथीदारांनी पलायन केले. रस्त्यावर बेवारस गाडी सोडून ते निघून गेले, तेव्हा पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला.
डाॅक्टरही अडकले जाळ्यात...
साताऱ्यातील एका डाॅक्टरला महिलेने हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढले होते. लाखो रुपये उकळण्याच्या इराद्याने त्या महिलेने संबंधित डाॅक्टरच्या हाॅस्पिटलमध्ये जाऊन गोंधळ घातला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. अशा प्रकारे साताऱ्यात अनेकांना गंडा घालण्यात आला. पण, कोणी तक्रार दिली नाही.
असे ओढले जाते जाळ्यात...
प्रतिष्ठित उद्योजक, डाॅक्टर, व्यापारी यांना हेरून त्यांचा मोबाइल नंबर घेतला जातो. त्यांच्याशी सलगी करून ओळख वाढवली जाते. त्यांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून पुरावे जमा केले जातात. त्यानंतर संबंधित महिलेचे खरे रूप समोर येते. ब्लॅकमेल करून संबंधितांकडे पैशांची मागणी केली जाते.
शंका आल्यास
तातडीने संपर्क साधा
हनी ट्रॅपचे प्रकार घडत असताना अनेक जण बदनामी होईल म्हणून तक्रार करीत नाहीत. याचाच गैरफायदा घेतला जातो. सोशल मीडियावर थोडीजरी शंका आली तरी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. तरच असे प्रकार रोखले जातील.
अनोळखींच्या फ्रेंडरिक्वेस्ट स्वीकारू नयेत. आपली फसगत होतेय, हे लक्षात आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांची पैशांची मागणी पूर्ण करून गुन्हेगारांना आणखी गुन्हा करण्यास एक प्रकारे प्रवृत्त केले जाते. त्यामुळे पैशांची मागणी मान्य करू नका.
- सजन हंकारे, पोलीस निरीक्षक