सावधान, कोरोना डोके वर काढतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:28 AM2021-02-22T04:28:41+5:302021-02-22T04:28:41+5:30
महाबळेश्वर : कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासन सतर्क झाले आहे. नियमांचे कोटेकोर पालन ...
महाबळेश्वर : कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासन सतर्क झाले आहे. नियमांचे कोटेकोर पालन होते की नाही याची पाहणी करण्यासाठी पोलीस, पालिका व महसूल कर्मचारी यांच्या दोन पाहणी पथकांची नेमणूक करण्यात आली असून ही पथके तालुक्यावर करडी नजर ठेवणार असल्याची माहिती तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांनी दिली.
महाबळेश्वर तालुक्यातून कोरोना हद्दपार होणार अशी स्थिती निर्माण झाली असतानाच राज्यात कोरोनाने डोके वर काढल्याने महाबळेश्वरकरांची चिंता वाढली आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून, याच मुंबईत मोठ्या प्रमाणावर पर्यटक महाबळेश्वर येथे येत असतात. त्यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. महाबळेश्वर व पाचगणी येथील रिसाॅर्टमधून लग्नाचे प्रमाण वाढले आहे. लग्न समारंभासाठी ५० व्यक्तींची मर्यादा असून, या मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, यासाठी हे विशेष पथक लक्ष ठेवणार आहे. ज्या ठिकाणी असे समारंभ व कार्यक्रम सुरू आहेत, अशा ठिकाणी हे पथक भेट देऊन पाहणी करणार आहे. जर नियमांपेक्षा अधिक गर्दी असेल तर तातडीने दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांनी दिली. हाॅटेलप्रमाणेच हे पथक महाबळेश्वर, पाचगणी व परिसरातील रेस्टाॅरंट बार यांचीदेखील पाहणी करणार आहे. या ठिकाणी आसन क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहक असतील तर अशा रेस्टाॅरंट व बारवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
(चौकट)
नियमांचे तंतोतत पालन करावे...
तालुक्यात अनेक ठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात. गावागावात यात्रा भरते, अशा ठिकाणीही गर्दी होणार नाही याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. बाजारपेठेतील दुकानदारांनीही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी. नागरिकांनीदेखील नियम पाळावेत. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, वारंवार साबणाने हात धुवावे व सॅनिटायझरचा नियमित वापर करावा.
कोरोना लोगो वापरणे..