सावधान, आपलीही दुचाकी जाऊ शकते चोरीला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:46 AM2021-03-01T04:46:29+5:302021-03-01T04:46:29+5:30
सातारा : कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन गुंतले असताना दुसरीकडे मात्र साताऱ्यात दुचाकी चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. या टोळीने ...
सातारा : कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन गुंतले असताना दुसरीकडे मात्र साताऱ्यात दुचाकी चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. या टोळीने वाहनचालकांच्या उरात धडकी भरवली असून, महिनाभरात तब्बल १८ दुचाकी या टोळीने चोरल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपली दुचाकी सुरक्षित ठिकाणी पार्क करावी, अन्यथा दुचाकी चोरीला गेलीच म्हणून समजा.
जिल्ह्यात गतवर्षी सात महिने लाॅकडाऊन होता. या काळात मात्र दुचाकी चोरीचे प्रकार पूर्णपणे थांबले होते; परंतु लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर चोरट्यांनी पुन्हा आपले काळे धंदे सुरू केले. अलीकडे शहरात क्वचितच ठिकाणी घरफोडी होत आहे. मात्र, दुचाकी चोरीला जाण्याचे प्रकार वाढले असल्याचे पाहायला मिळत आहे. शहर व परिसरातून रोज दोन दुचाकी तरी चोरीला जात आहेत. त्यामुळे वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे रात्रीच्या सुमारास या चोऱ्या होत नसून, दिवसाढवळ्या दुचाकी चोरीला जात आहेत. बसस्थानक, पोवई नाका, विसावा नाका या ठिकाणाहून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच शाहूपुरी परिसरातही सातत्याने दुचाकी चोरीला जात आहेत. अलीकडे चोरीचे प्रमाण वाढल्याने वाहनधारक हतबल झाले आहेत. चोरीस गेलेली दुचाकी पुन्हा सापडेल की नाही, याची शाश्वती कोणालाही देता येत नाही. अनेकांनी कर्ज काढून गाड्या खरेदी केल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी औद्योगिक वसाहतीमधील एका युवकाची दुचाकी चोरीला गेली. कर्ज काढून नवीन दुचाकी त्याने खरेदी केली होती. या दुचाकीवरून तो रोज कंपनीत कामाला जात होता. अचानक दुचाकी चोरीस गेल्याने त्याच्यावर आर्थिक संकट तर ओढावलेच, पण कर्ज कसे फेडायचे, या चिंतेने त्याला ग्रासले आहे. या युवकाचे हे प्रातिनिधीक उदाहरण असले तरी अशा प्रकारे रोज चोरीला जाणाऱ्या दुचाकी मालकांची काय अवस्था होत असेल यावरूनच आपल्याला अंदाज येईल. त्यामुळे आपल्या वाहनाची आपणच काळजी घेतली पाहिजे. पे ॲंड पार्कमध्ये पैसे जातील म्हणून रस्त्यावर बेवारस दुचाकी उभी करणे, हे अनेकांच्या अंगलट आले आहे. त्यामुळे सातारकरांनी सावधानता बाळगली पाहिजे.
चाैकट : काय काळजी घ्याल..
ओळखीच्या ठिकाणी गाडी पार्क करावी
पे ॲण्ड पार्क सुरक्षित ठिकाण
सीसीटीव्हीच्या कक्षेत गाडी उभी करावी
हॅण्डल लाॅक आवश्यक आणि मागच्या चाकात आणखी एक लाॅक गरजेचे
गाडी चोरीला गेल्यानंतर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा
चाैकट : कशी ठेवली जातेय पाळत..
दुचाकी पार्क केल्यानंतर एक व्यक्ती दुचाकी मालक कुठे जातोय, याचा पाठलाग करतो, तर दुसरी व्यक्ती दुचाकी बनावट चावीने चोरून नेत असते. काही वेळाला तासन्तास दुचाकी एकाच जागेवरच उभी असल्याचे पाहून चोरटे दुचाकी चोरून नेत आहेत. दिवसाला दोन दुचाकी चाेरीला जात आहेत. म्हणजे महिन्याकाठी तब्बल ६० दुचाकी चोरीला जातील. एवढ्या मोठ्या संख्येने दुचाकी चोरीला जात असल्याने पोलिसांनीही आता ही टोळी शोधून सातारकरांच्या गाड्या वाचवाव्यात.
चाैकट : साताऱ्यात सीसीटीव्हीचे जाळे कधी..
पुण्यासारख्या शहरामध्ये पावलोपावली सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. यामुळे गुन्हेही तत्काळ उघड होतायत. याउलट परिस्थिती साताऱ्यात आहे. सीसीटीव्ही नसल्यामुळे दुचाकी चोरट्यांचे फावत आहे. प्रत्येक ठिकाणी पोलिसांना लक्ष देणे शक्य होणार नाही; परंतु सीसीटीव्हीचे शहरात जाळे निर्माण केले तर चोरीचे प्रकार नक्कीच आटोक्यात येतील, अशी आशा आहे.