सावधान.. इथं पावलोपावली जिवाची भीती!
By admin | Published: April 19, 2017 11:03 PM2017-04-19T23:03:57+5:302017-04-19T23:03:57+5:30
लोंबकळणाऱ्या तारांचे प्रमाण वाढले : कऱ्हाडातील रस्त्यावरील स्थिती; मालवाहू वाहनांना नेहमीच वाढता धोका
कऱ्हाड : शहरातील विविध भागांबरोबर मुख्य मार्गावर वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत तारा या सध्या खाली लोंबकळत असलेल्या पाहावयास मिळत आहेत. या लोंबकळणाऱ्या तारांमुळे मालवाहू ट्रक व गाड्यांना शॉक लागून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. महावितरणकडून याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. महावितरणच्या या कारभाराबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
कऱ्हाड शहरात महावितरणच्या वतीने रस्त्याच्या बाजूने घरगुती विद्युत तारांची लाईन नेण्यात आली आहेत. तर मुख्य विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांची लाईन ही मुख्य रस्त्यांच्यामधून उंची वाढवून नेण्यात आलेली आहे. मात्र, शहरातील दत्त चौक ते चावडी चौक मार्ग, बसस्थानक मार्ग ते कृष्णा नाका व भेदा चौक ते पोपटभाई चौक या मुख्य मार्गावर काही ठिकाणी अजूनही विद्युत तारा या खाली लोंबकळत असलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला आहे.
शहरात घरगुती, खासगी कंपनी तसेच छोट्या उद्योगांना महावितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा केला जातो. शहरातील दत्त चौक ते चावडी चौक या मार्गावर शहरातील मुख्य बाजारपेठ असल्याने या ठिकाणी नेहमीच ट्रक तसेच चारचाकी वाहनांची वर्दळ असते.
या ठिकाणी माल घेऊन येणाऱ्या वाहनांना सध्या या विद्युत तारा थटत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वीजवाहक तारा रस्त्यावर खाली लोंबकळत असल्याने त्यापासून लहान मुलांच्या जीवितासही धोका निर्माण होत आहे. येथील लोंबकळणाऱ्या तारा हटविण्याबाबत तसेच तारांची उंची वाढविण्यासाठी अनेकवेळा वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे नागरिकांकडून मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे.
कऱ्हाड शहरातील उपजिल्हा रुग्णालय, कृष्णा नाका, जनता बँकेसमोरील चौक, मंगळवार पेठ, कन्याशाळा, नवीन भाजी मंडई परिसर, शुक्रवार पेठ, सोमवार पेठ, कृष्णामाई घाट परिसर, शुक्रवार पेठ या ठिकाणांवरील रस्त्याकडेला सध्या वीजवाहक तारा खाली लोंबकळत असून, त्यांची उंंची वाढविणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे शहरात काही ठिकाणी वीजवितरण कंपनीने भूअंतर्गत वीजवाहक तारांच्या जोडण्या केल्या आहेत. मात्र, रस्त्यांच्या डागडुजीच्या कामांसाठी रस्ता उकरला असल्याने काही ठिकाणी तारा रस्त्यावरच आलेल्या आहेत. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे महावितरणकडून लक्ष देणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)