फेसबुकवरून पैशाची मागणी झाली तर सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:40 AM2021-05-18T04:40:56+5:302021-05-18T04:40:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा: कोरोनाच्या महामारीत अनेक जण विरंगुळा म्हणून सोशल मीडियाचा वापर अधिकच करू लागले आहेत. फेसबुकवर अनोळखीच्या ...

Beware if money is demanded from Facebook! | फेसबुकवरून पैशाची मागणी झाली तर सावधान!

फेसबुकवरून पैशाची मागणी झाली तर सावधान!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा: कोरोनाच्या महामारीत अनेक जण विरंगुळा म्हणून सोशल मीडियाचा वापर अधिकच करू लागले आहेत. फेसबुकवर अनोळखीच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारून बऱ्याच जणांना पश्चात्ताप होऊ लागलाय. त्याचे कारण म्हणजे सुरुवातीला ओळख निर्माण करून संबंधित व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्यानंतर त्याला बदनामीची भीती दाखवून त्याच्याकडून पैसे उकळायचे, असे सर्रास प्रकार आता घडू लागले आहेत, त्यामुळे नागरिकांनी प्रचंड खबरदारी घेणे गरजेचे आहे. असे जर प्रकार होत असतील तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून आपल्यावर ओढवणारे संकट टाळावे, असे आवाहन पोलीस करीत आहेत.

जिल्ह्यात बरेच प्रकार असे घडत आहेत; मात्र अनेक जण आपली बदनामी होईल, या भीतीपोटी तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. सध्या सर्वांनाच कोरोनाच्या महामारीने अक्षरश: वेठीस धरले आहे. सर्व व्यवहार ठप्प आहेत. लोकांना एकमेव विरंगुळ्याचे साधन म्हणून अनेक जण सोशल मीडियाचा वापर करीत आहेत; परंतु हाच आता सोशल मीडियाचा वापर अनेकांसाठी आर्थिक भुर्दंड ठरत आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर १८ ठिकाणी पैसे मागण्याचे प्रकार घडले आहेत. अनेक प्रकार असे घडूनही लोक आपली बदनामी होईल म्हणून तक्रारच दाखल करत नाहीत, असेही पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर संबंधित युवती किंवा महिलेकडून प्रेमाच्या भूलथापा मारल्या जातात. या भूलथापांना बळी पडून अनेक युवक, पुरुष आपले भान हरपून बसतात. त्यानंतर संबंधित युवतीकडून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारलेल्या व्यक्तीचा मोबाइल नंबर अथवा ईमेल आयडी घेतात. त्यावर दोघांचे झालेले चॅटिंग किंवा मार्फ करून फोटो पाठवतात. जर मला पैसे दिले नाही तर हे मी सर्व फोटो आणि चॅटिंग सोशल मीडियावर अपलोड करेन, अशीही धमकी दिली जाते. या प्रकारामुळे भांबावून गेलेली व्यक्ती मग बदनामीपोटी संबंधित युवतीला ती सांगेल, तेवढे पैसे देत असते. असे प्रकार सध्या अनेक ठिकाणी घडत असून, नागरिकांनी प्रचंड सतर्कता दाखवणे गरजेचे आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये तरच आपली फसगत होणार नाही.

चौकट: परिचयातील व्यक्तीच्या नावाचा वापर

कोरोना काळामध्ये अनेक जण भयभीत झाले आहेत. अनेकांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी पैसे नाहीत, असे असताना अनेक जण ओळखीच्या नावाचा गैरफायदा घेऊन अनेकांकडे पैशाचीही मागणी करत आहेत. भावनिक आवाहन करून आपल्याला जाळ्यात अडकवले जाते. अशावेळी शहानिशा केल्याशिवाय समोरच्या व्यक्तीला कसलेही पैसे पाठवू नये.

फेसबुकवर अनेकदा हनीट्रॅपचे प्रकारच उघडकीस आले आहेत. काही ठिकाणी कोणीही ओळखीचे नसताना फसवणूक होत आहे. साताऱ्यामध्ये अशा प्रकारचे तीन जण फसले गेले होते. त्यामध्ये एक डॉक्टर, एक सैन्य दलातील जवान आणि सर्वसामान्य कुटुंबातील एका युवकाचा समावेश होता.

चौकट: अशी घ्या काळजी

फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. आपली वैयक्तिक कौटुंबिक माहिती फेसबुकवर प्रसारित करू नका. फेसबुकद्वारे तुमचे करंट लोकेशन कोठे आहे, हे प्रसारित करू नका. तुमच्या फेसबुक अकाउंटचा स्ट्रॉंग पासवर्ड तयार करा. फेसबुक अकाउंटचा ताबा तुमच्या परवानगीशिवाय कोणी घेतला असेल तर पोलिसांशी संपर्क साधा. तुमच्या फेसबुक अकाउंटचा पासवर्ड इतर कोणाबरोबरही शेअर करू नका.

१) वर्षभरात सायबर सेल पोलिसांकडे झालेल्या तक्रारी

१८

२) फेसबुकवरून फसविल्याच्या तक्रारी

२३

कोट : अनोळखी व्यक्तीकडून आलेली फ्रेंड रिक्वेस्ट कोणीही स्वीकारू नये. आपली खासगी माहिती फेसबुकमध्ये अपलोड करू नये. जर आपली फसवणूक होत आहे, हे माहिती झाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

नवनाथ घोगरे, सहायक पोलीस निरीक्षक

सायबर सेल प्रमुख.

Web Title: Beware if money is demanded from Facebook!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.