भाग्यश्री माने खून प्रकरण: दोन मांत्रिकांसह आजी ताब्यात, अंधश्रद्धेतून खून झाल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 11:24 AM2022-07-20T11:24:50+5:302022-07-20T11:25:14+5:30
तब्बल साडेतीन वर्षांपूर्वी २१ जानेवारी २०१९ रोजी तळमावले येथील महाविद्यालयात शिक्षणासाठी गेलेली भाग्यश्री माने ही विद्यार्थिनी दुसऱ्या दिवसापर्यंत घरी परतलीच नव्हती.
ढेबेवाडी : करपेवाडी, ता. पाटण येथे साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या महाविद्यालयीन युवतीच्या खुनाला अखेर वाचा फुटली. या खुनात युवतीच्या नातेवाइकांचाच हात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांंनी दोन मांत्रिक आणि आजीसह एक नातेवाईक असे चार संशयितांना ताब्यात घेतले असून, अजूनही काही जणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. अंधश्रद्धेतून हा खून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तब्बल साडेतीन वर्षांपूर्वी २१ जानेवारी २०१९ रोजी तळमावले येथील महाविद्यालयात शिक्षणासाठी गेलेली भाग्यश्री माने ही विद्यार्थिनी दुसऱ्या दिवसापर्यंत घरी परतलीच नव्हती. त्यामुळे तिच्या नातेवाइकांनी २२ जानेवारी २०१९ रोजी ढेबेवाडी पोलिसांत तक्रार दिली. त्याचदरम्यान गावाशेजारून तळमावलेकडे जाणाऱ्या पाऊलवाटेच्या शेजारच्या शेतात भाग्यश्रीचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.
भाग्यश्रीचा गळा धारधार शस्राने चिरल्याचे स्पष्ट झाले. मात्र, ज्याठिकाणी तिचा मृतदेह सापडला तिथे मारेकऱ्यांनी कोणताही पुरावा सोडला नव्हता. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. पोलिसांसह काही तज्ज्ञांनीही हा खून म्हणजे अंधश्रद्धेचाच बळी असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तपासही त्याच दिशेने गतिमान केला. राज्यासह परराज्यातीलही काही मांत्रिकांना ताब्यात घेतले. एवढेच काय तर खुनानंतर आठच दिवसात भाग्यश्रीच्या आईवडिलांनाही ताब्यात घेऊन कसून तपास केला. मात्र अंधश्रद्धेवर ठाम श्रद्धा असलेल्या कुणीच काही माहिती दिली नाही. त्यामुळे तपास ढेपाळला होता.
पोलीस थकले; पण तपास थांबला नाही..
ढेबेवाडी पोलिसांसह सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाच्या तपासासाठी वेगवेगळ्या पातळीवर यंत्रणा राबविली. राज्यासह परराज्यात हजारो किलोमीटरचा प्रवास पोलिसांनी केला. मात्र, मारेकऱ्यांनी चार वर्षे पोलिसांना चकवा दिला. ‘इथेच आहे; पण दिसत नाही’ याप्रमाणे भाग्यश्रीच्या नातेवाइकांनीही तपासात पुढाकार घेतला. अखेर पोलिसांनी वरिष्ठांकडे नातेवाइकांच्या नार्को टेस्टचीही मागणी केली आणि भाग्यश्रीच्या मारेकऱ्यांवर पोलिसांनी झडप घातलीच.
करपेवाडीत चर्चांना उधाण... मांत्रिक कर्नाटकातील
दोन दिवसांपासून गावात पोलिसांची ये-जा चालू झाल्याने तसेच मयत भाग्यश्रीचे घर ते तिच्या मृत्यूचे ठिकाण अशी चाचपणी चालू झाल्याने आता लवकरच खुनाचा उलगडा होणार, अशा चर्चा दबक्या आवाजात चालू झाल्या आहेत. दोन मांत्रिकांमध्ये एका कर्नाटकातील मांत्रिकाचा समावेश असून, आजीच्या सहभागामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.