साताऱ्यातील भांबवली वजराई धबधबा हंगाम आजपासून सुरू, देशातील सर्वाधिक उंचीचा धबधबा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 12:46 PM2024-06-28T12:46:39+5:302024-06-28T12:49:21+5:30
हिरव्यागर्द झाडीतील धुवाँधार पावसाचा व धबधब्याचा थ्रिलिंग अनुभव घेण्यासाठी पर्यटक भांबवली वजराई धबधब्याला भेट देतात
पेट्री : शहराच्या पश्चिमेस मागील दोन आठवड्यांपासून पावसाने अधूनमधून दमदार हजेरी लावली आहे. पाऊस संततधार सुरू असल्याने छोटे-मोठे धबधबे फेसाळू लागले आहेत. पर्यटकांचे लक्ष वेधणारा भारतातील सर्वाधिक उंचीचा भांबवली वजराई धबधब्याचा हंगाम शुक्रवारपासून सुरू होणार असल्याने पर्यटकांमध्ये आनंद, उत्साहाचे वातावरण आहे.
देशातील सर्वाधिक उंचीचा भांबवली वजराई धबधबा आता पर्यटन विकासासाठी सज्ज झाला आहे. परिसर डोंगराळ असून, घनदाट झाडीचा असल्यामुळे पर्यटकांना चालताना कसरत करावी लागते. विशेष करून वयस्कर पर्यटकांची मागणी होती की चालण्यासाठी सोयीस्कर पायवाट व्हावी. जांभ्या दगडाची पायवाट झाली आहे.
पर्यटक हिरव्यागर्द झाडीतील धुवाँधार पावसाचा व धबधब्याचा थ्रिलिंग अनुभव घेण्यासाठी जुलै, ऑगस्ट महिन्यांत भांबवली वजराई धबधब्याला भेट देतात. भांबवलीतील सध्याचे वातावरण मनमोहक असून, धुवाँधार पावसाच्या सरी, गार-गार वारा, रानकिड्यांचे आवाज, हिरवी गर्द झाडी, धबधब्याच्या पाण्याचा प्रचंड प्रपात, निसर्गाचा खुललेला नजारा पाहून मन प्रफुल्लित होत आहे.
विकास काम सुरू
भांबवली वजराई धबधब्याला २०१८ मध्ये ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता मिळून धबधब्याच्या विकासाचे काम सुरू झाले. घनदाट जंगल, दुर्गम डोंगरातून जाताना पर्यटकांना कसरत करावी लागायची. पहिल्या टप्प्यातील पायऱ्या, रेलिंगच्या कामामुळे डोंगरातून घसरगुंडीची समस्या दूर झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात वाॅच टाॅवर व पॅगोडाचे काम झाले असून, निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येत आहे. तिसऱ्या टप्प्यातील बांबू (गेस्ट) हाऊसचे काम पूर्ण झाले असून, पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद मिळेल.
पांढऱ्या शुभ्र पाण्याचा प्रपात जणू काही दुधाळ धबधबा.. काळ्याकुट्ट दगडावरील, हिरव्यागर्द झाडीतील धबधब्याची विहंगम नजारा पाहायला निसर्गप्रेमी पर्यटकांच्या नजरा आसुसलेल्या असतात. सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, सहकार्यातून भांबवली वजराई धबधबा प्रमुख, आकर्षक पर्यटनस्थळ होण्याच्या मार्गावर आहे. पर्यटकांनी या हंगामात भांबवलीला जरूर भेट देऊन निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा. - रवींद्र मोरे, पर्यटनप्रमुख, भांबवली