दुशेरे सोसायटीवर भरतदास पॅनेलचा झेंडा
By admin | Published: March 29, 2016 10:17 PM2016-03-29T22:17:07+5:302016-03-30T00:03:07+5:30
सर्वपक्षीय पॅनेलचा पराभव : धोंडिराम जाधवांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
कऱ्हाड : दुशेरे, ता. कऱ्हाड येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. यात कऱ्हाड पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते व कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली भरतदास महाराज पॅनेलने नऊ जागा जिंकत विजयाचा झेंडा फडकाविला. विरोधी सर्वपक्षीय पॅनेलला पराभव स्वीकारावा लागला.
तालुक्याच्या राजकारणात दुशेरे गावला नेहमीच महत्त्व राहिले आहे. त्यामुळे येथील विकास सोसायटीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. रविवार, दि. २७ रोजी सोसायटीसाठी मतदान झाले. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीमुळे यश नेमके कोणाच्या पारड्यात पडणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, वयाच्या एकोणीसाव्या वर्षी सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या धोंडिराम जाधव यांच्या नेतृत्वाखालील भरतदास महाराज पॅनेलने बाजी मारल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. हा विजय खेचून आणण्यासाठी धोंडिराम जाधव यांना प्रकाश जाधव, उदय जाधव यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची मोलाची मदत झाली.
भरतदास पॅनेलचे प्रताप जाधव, बाजीराव जाधव, राजाराम जाधव, हिंदुराव जाधव, सुभाष जाधव, सिंधुताई जाधव, कुसूम पाटील, आत्माराम मदने व नामदेव कोकणे तर विरोधी पॅनेलमधून अभिजित जाधव, पांडुरंग जाधव, उत्तम जाधव, भीमराव पवार हे उमेदवार विजयी झाले. या निकालामुळे धोंडिराम जाधव यांच्या नेतृत्वावरही पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, निकालानंतर भरतदास पॅनेलच्या विजयी उमेदवारांचा कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते
सत्कार करण्यात आला. तर माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, डॉ. अतुल भोसले, अॅड. उदय पाटील यांनीही नवनिर्वाचित संचालकांना वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)
एक बिनविरोध
भरतदास महाराज पॅनेलचे नामदेव कोकणे हे उमेदवार सुरुवातीलाच बिनविरोध म्हणून निवडून आले होते. त्यामुळे निवडणुकीत हेच पॅनेल बाजी मारणार, अशी चर्चा सुरुवातीपासून होती. मात्र, तालुक्यातील बदलत्या राजकीय समिकरणामुळे दुशेरेतही धोंडिराम जाधव यांच्या विरोधात सर्वपक्षीय गट एकत्र येऊन रिंगणात उतरल्यामुळे निवडणुकीत रंगत भरली.