भरतगाववाडीचे जगताप दाम्पत्य लष्करात अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:22 AM2018-08-15T00:22:37+5:302018-08-15T00:22:43+5:30
जगदिश कोष्टी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शिक्षकाला शिक्षिका, इंजिनिअरला इंजिनिअर जोडीदार हवा असतो; पण लष्करी अधिकारी असलेल्या जोडीदाराशी लग्न केल्याचे कोठे एकीवात नसेल; पण सैैनिकांच्या सातारा जिल्ह्यातच हा चमत्कार घडू शकतो. भरतगाववाडी येथील जगताप दाम्पत्य भूदल अन् नौदलात अधिकारीपदी कार्यरत आहेत. याचा भरतगाववाडी ग्रामस्थांना अभिमान वाटतो.
सातारा तालुक्यातील भरतगाववाडी येथील देवीकिरण विठ्ठलराव जगताप यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. बारावीपर्यंतचे शिक्षण यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयातून पूर्ण केले. पुढे १९९९ मध्ये नौदलात रुजू झाले. सध्या ते एक्झिक्युटिव्ह कमांडरपदी कार्यरत आहेत. त्यांनी आजवर आयएनएस अजय अन् आयएनस त्रिकंटवर महत्त्वपूर्ण कामगिरी सांभाळली.
मुंबई येथे त्यांच्यासमवेत लिंब गोवे येथील एक सहकारी कार्यरत होत्या. त्यांनी देवीकिरण यांना भूदलात अधिकारी असलेल्या धनश्री या बहिणीविषयी लग्नासंदर्भात चर्चा केली. दोघेही एकमेकांना पसंत पडले. याविषयी घरी सांगितले असता लष्करात अधिकारी असलेली मुलगी सूनबाई होत असल्याचा आई-वडिलांना आनंदच झाला अन् साताऱ्यात ३० जानेवारी २००५ रोजी ते विवाहबद्ध झाले. त्यांना मुलगा आणि एक मुलगी जुळे आहेत.
धनश्री यांचे गाव लिंब गोवे. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर यूपीएससीच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा देऊन भारतीय लष्करात लेफ्टनंट कॅप्टनपदी रुजू झाल्या. जिल्ह्यातील पहिल्या
महिला कॅप्टन बनण्याचा मान धनश्री यांना मिळाला. लष्करात
रणगाडे जाण्यासाठी पूल
बांधण्याची जबाबदारी धनश्री यांच्याकडे असते. देशसेवा करत असले तरी त्यांची गावाशी जोडलेली नाळ तुटलेली नाही. गावाकडे काही धार्मिक कार्यक्रमासाठी येत असतात.
चुलते १९६५ च्या युद्धात शहीद
देवीकिरण जगताप यांचे चुलते कृष्णात जगताप हे लष्कारात जवान होते. १९६५ च्या युद्धात ते शहीद झाले होते. तरीही देवीकिरण यांना सैन्यात जाण्यास कोणीही विरोध केला नाही.