संवादात भारावली तरुणाई...
By admin | Published: July 25, 2016 10:46 PM2016-07-25T22:46:32+5:302016-07-25T23:07:35+5:30
भरगच्च कार्यक्रम : नांगरे-पाटील यांनी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांशीही केली चर्चा
सातारा : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी जिल्हा पोलिस मुख्यालयात संवाद साधण्यासाठी सोमवारी तरुण-तरुणींनी गर्दी केली होती.
आयोगाच्या परीक्षा द्या, उद्या तुमची सही कोणी मागितली पाहिजे, असं काम करून दाखवा, अशा ओजस्वी शब्दांमुळे तरुणाई
भारावून गेली. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यावेळी उपस्थित होते.
नांगरे-पाटील यांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर ते प्रथमच साताऱ्यात आले. त्यांच्या दौऱ्याची उत्सुकता पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये होती.
सोमवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांनी शिवतेज हॉलमध्ये पोलिस अधिकाऱ्यांशी क्राईम मीटिंग घेतली. अधिकाऱ्यांकडून गुन्ह्यांचा आढावा घेतला.
त्यांनी दुपारनंतर पोलिस करमणूक केंद्रामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबतही त्यांनी जाणून घेतले.
सायंकाळी पोलिस अधीक्षकांच्या दालनात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबतच कॉलेजचे युवक-युवती यावेळी नांगरे-पाटील यांना भेटायला आले होते.
त्यांच्याशी बोलल्यानंतर मोठ्या उत्साहात ही तरुणाई पोलिस अधीक्षकांच्या दालनातून बाहेर येताना पाहायला मिळाली. (प्रतिनिधी)