भरधाव टेम्पोची तीन वाहनांसह पादचाऱ्याला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:24 AM2021-07-03T04:24:49+5:302021-07-03T04:24:49+5:30

सातारा : साताऱ्यातील बाँबे रेस्टॉरंट चौकाजवळ कोबी घेऊन जाणाऱ्या भरधाव टेम्पोची तीन वाहनांसह पादचारी तरुणाला धडक बसली. यामध्ये तरुण ...

Bhardhaw Tempo hit a pedestrian with three vehicles | भरधाव टेम्पोची तीन वाहनांसह पादचाऱ्याला धडक

भरधाव टेम्पोची तीन वाहनांसह पादचाऱ्याला धडक

googlenewsNext

सातारा : साताऱ्यातील बाँबे रेस्टॉरंट चौकाजवळ कोबी घेऊन जाणाऱ्या भरधाव टेम्पोची तीन वाहनांसह पादचारी तरुणाला धडक बसली. यामध्ये तरुण जागीच ठार, तर कारमधील चौघेजण जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातानंतर टेम्पो पलटी झाल्याने सेवा रस्त्यावर कोबी भरलेली पोती आणि गड्डे दिसत होते.

याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास कऱ्हाड बाजूकडून टेम्पो (केए ०२, एएफ २२१५) साताऱ्याकडे येत होता. या टेम्पोमध्ये कोबी भरलेले होते. पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळील ठक्कर सिटीसमोर टेम्पो महामार्गावरून बाजूचा कठडा ओलांडून सेवा रस्त्यावर आला. या वेळी या टेम्पोची धडक कार, दुचाकी, पिकअप तसेच पादचारी तरुणाला बसली. त्यानंतर टेम्पो पलटी झाला. या अपघातात किरण गोरख गुजर (वय ३५, रा. भोसरे, ता. खटाव) हा तरुण जागीच ठार झाला, तर कारमधील चौघेजण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. तसेच जखमींना खासगी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, टेम्पो पलटी झाल्यानंतर कोबीची पोती सेवा रस्त्यावर अस्ताव्यस्त पडली होती. तर कोबीचे गड्डेही विखुरले गेले होते. या अपघातात टेम्पोसह, कार, दुचाकी आणि पिकअपचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी सातारकर नागरिकांनीही पाहण्यासाठी गर्दी केली होती.

चौकट :

तरुण खरेदीसाठी चाललेला...

अपघातात ठार झालेला तरुण हा भोसरे येथील रहिवासी होता. तो रंगकाम व्यावसायिक होता. सध्या त्याचे वास्तव्य साताऱ्यातील गोडोली परिसरात होते. तो खरेदीसाठी एका ठिकाणी जात होता. पायी जात असतानाच हा अपघात झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

................

अपघाताबाबत अनेक मते...

टेम्पो महामार्गावरुन पुण्याच्या बाजूने चालला होता. टेम्पो मधील दुभाजकाच्या बाजूने चालला होता. पण, अचानक डाव्या बाजूला वळून मधल्या दोन लेन पार करत सेवा रस्त्यावर आला. तसेच याबाबतच्या स्पष्ट खुणा दिसत आहेत. ट्रकचे टायरही चांगले आहेत. त्यामुळे टायरही फुटले नाहीत. टेम्पो अचानक डाव्या बाजूला वळून दोन लेन पार करत सेवा रस्त्यावर कशामुळे आला, याबद्दल माहिती मिळविण्याचे पोलिसांचे काम सुरू होते.

फोटो दि.०२सातारा अ‍ॅक्सिडेंट फोटो...

फोटो ओळ : सातारा येथे अपघातानंतर टेम्पो पलटी झाला होता. या वेळी रस्त्यावर कोबी तसेच पोती पडली होती. (छाया : जावेद खान)

.....................................................

Web Title: Bhardhaw Tempo hit a pedestrian with three vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.