भरतीच्या आमिषाने चार लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:25 AM2018-04-14T00:25:10+5:302018-04-14T00:25:10+5:30
कोरेगाव : सैन्यात भरतीचे आमिष दाखवून बोरजाईवाडी येथील निरंजन राजेंद्र कदम याची चार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दहिवडी येथील महारुद्र करिअर अॅकॅडमीचा चालक राजकुमार बजरंग काटकर (रा. कुकुडवाड) व नीता डोंबे (रा. शिरसवडी, ता. खटाव) यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
बोरजाईवाडी येथील किशोर रामचंद्र कदम यांची राजकुमार काटकर याच्यासमवेत ओळख झाली, त्याने ‘दहिवडी येथे करिअर अॅकॅडमी चालवत असून, सैन्य दलामध्ये मुलांना भरती करतो,’ असे सांगितले. कदम यांनी चुलत बंधू राजेंद्र हरिश्चंद्र कदम यांना काटकर याची ओळख सांगत, तो सैन्य दलामध्ये मुलांना भरती करत असल्याचे सांगितले. राजेंद्र यांना मुलगा निरंजन याला सैन्य दलात भरती करावयाचे असल्याने त्यांनी घरात सर्वांशी चर्चा केली. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०१६ रोजी राजकुमार काटकर हा नीता डोंबे हिला बरोबर घेऊन बोरजाईवाडीत आला.
तेथे सविस्तर चर्चा झाल्यानंतर काटकर याने निरंजन याला सैन्य दलात भरतीसाठी चार लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. अॅडव्हान्स म्हणून दोन लाख रुपये आणि कॉल लेटर आल्यानंतर दोन लाख रुपये देण्याचे ठरले. त्याप्रमाणे राजेंद्र कदम यांनी बँक आॅफ महाराष्टÑ आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यातून रक्कम काढून काटकर याच्याकडे दोन लाख रुपये दिले.
त्यानंतर काटकर याने वारंवार पैशांसाठी तगादा लावला. मात्र कॉल लेटर आल्याशिवाय पैसे देणार नसल्याचे कदम यांनी सांगताच, दि. १४ सप्टेंबर २०१७ रोजी काटकर व डोंबे यांनी राजेंद्र कदम व निरंजन कदम यांना तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद येथील एमसीई, एमई येथील प्रशिक्षण केंद्रात घेऊन गेले. तेथे आण्णा नावाच्या व्यक्तीशी ओळख करून दिली. त्याने १५ दिवसांत कॉल लेटर येईल, असे सांगितले. त्यानंतर दि. १५ आॅक्टोबर २०१७ च्या दरम्यान काटकर याने बोरजाईवाडीत येऊन निरंजन याला प्रशिक्षणाला पाठवायचे आहे, असे सांगितले. राजेंद्र कदम यांनी सोसायटीतून कर्ज काढून १ लाख रुपये आणि मेहुणे नितीन पवार यांच्याकडून १ लाख रुपये घेतले. दोन लाख रुपये त्यांनी काटकर याला दिले. त्यानंतर काटकर हा परत आलाच नाही.
मोबाईल कॉल घेणेही बंद
त्याने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर वेळोवेळी संपर्क साधून सैन्य भरतीबाबत विचारणा केल्यावर ‘तुमचे काम लवकरच होणार आहे,’ असे तो सांगत होता. त्यानंतर त्याने मोबाईलवर कॉल घेणे बंद केले.