पोलिसांना फोन करणाऱ्या भारतीचा खून वस्तऱ्याने !
By Admin | Published: November 23, 2014 12:30 AM2014-11-23T00:30:53+5:302014-11-23T00:33:54+5:30
आरोपी काकाची कबुली : गुन्ह्यात वापरलेले शस्त्र वाईच्या कृष्णा नदीतून जप्तं
वाई : वस्तीवरील लोकांच्या चहाड्या करीत होती. तसेच पोलिसांना फोन करून वस्तीवरील लोकांना त्रास देत होती. यामुळे भारती भोसले हिचा मांढरदेव येथे खून केल्याची कबुली तिचा काका (मावशीचा नवरा) देवीचंद भोसले याने दिली आहे. याप्रकरणी देवीचंदला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला वस्तरा वाई येथील कृष्णा नदीपात्रातून मिळविण्यात यश मिळविले आहे.
वाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांढरदेव (ता. वाई) येथे बुधवारी काळुबाई देवीच्या मंदिर परिसरातील घनदाट झाडीत भारती भोसले (वय १४) हिचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला होता. घटनास्थळी सापडलेल्या धागेदोऱ्याच्या सहायाने पोलिसांची पथके शोध घेत होती.
याप्रकरणी भारतीच्या मावशीचा नवरा देवीचंद जगू भोसले (वय ४९, रा. धावजी पाटील वस्ती, सुरूर, ता. वाई) याला पोलिसांनी इंदापूर येथून ताब्यात घेतले होते. पोलिसी खाक्या दाखविताच देवीचंद भोसले याने खून केल्याचे कबूल केले. ‘भारती ही वस्तीतील घराघरांत चहाड्या करून भांडणे लावत होती. तसेच पोलिसांना फोन करून त्रास देत होती. त्यामुळे राग धरून तिचा खून केला,’ अशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली.
गुन्ह्यात वापरलेला वस्तरा देवीचंद भोसले याने वाई येथील महागणपती मंदिरासमोरील कृष्णा नदीपात्रात टाकला होता. तो पोलिसांनी मिळविला आहे. देवीचंद भोसले याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे, पोलीस निरीक्षक रमेश गलांडे करीत आहेत. (प्रतिनिधी)