घडव घडव रे सोनारा...

By admin | Published: March 24, 2015 10:00 PM2015-03-24T22:00:37+5:302015-03-25T00:47:41+5:30

‘हिंदू सुनार’च्या पुन्हा दोन पोटशाखा असून, त्यानंतर गोत्रांनुसार ५२ पोटशाखा आहेत. याखेरीज काही प्रांतिक आणि अप्रांतिक गटही दिसून येतात.

Bhatav karva ray shahnara ... | घडव घडव रे सोनारा...

घडव घडव रे सोनारा...

Next

प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी ‘सोनाराने कान टोचण्याची’ वेळ येतेच. ‘नळी फुंकिले सोनारे...’ न्यायाने आपण कुणाच्यातरी बोलण्याकडे दुर्लक्ष करतोच. ‘सौ सुनार की’ म्हणत कुणीतरी अखंडपणे केलेलं छोटं काम एके दिवशी मोठ्ठं दिसू लागतं. संत नरहरी महाराजांच्या भक्तिरचना असोत वा ‘घडव घडव रे सोनारा.. माणिक मोती बिजवरा’ अशी भोंडल्यातली गाणी असोत, साहित्य आणि लोकवाड्.मयात ‘सुवर्णकार’ शेकडो वर्षांपासून डोकावत राहिलाय. सोन्याचे अलंकार घडविणाऱ्या या सुवर्णकाराचा इतिहासही असाच शेकडो वर्षे जुना. ‘स्वर्ण-कार’ या संस्कृत शब्दापासून ‘सुनार’ आणि मग ‘सोनार’ असा अपभ्रंश झाल्याचं मानलं जातं.  भारत आणि नेपाळमध्ये प्रामुख्यानं हिंदू धर्मातील असणारे सुवर्णकार पंजाब आणि हरियाणात शीख समाजातही पाहायला मिळतात. हरियाणात तर ‘हिंदू सुनार’ आणि ‘सिख सुनार’ अशा पोटशाखा पाहायला मिळतात. ‘खत्री’ समाजातील काही व्यक्तींनीही सुवर्णकारांच्या व्यवसायात पूर्वापार जम बसवलाय. ‘हिंदू सुनार’च्या पुन्हा दोन पोटशाखा असून, त्यानंतर गोत्रांनुसार ५२ पोटशाखा आहेत. याखेरीज काही प्रांतिक आणि अप्रांतिक गटही दिसून येतात. संतनपुरिया, देखलांतिया, मुंदाहा, भिगाहिया, सामूहिया, चिल्लिया, कटिलिया कलिदारवा, नौबस्तवाल अशा नावांनी हे गट संबोधले जातात. उत्तर भारतात अनेक सुवर्णकार जमीनदार बनून शेतीवाडीत रमले. शिवाय व्याजाने पैसे देण्याचा व्यवसायही त्यांनी केला. तथापि, सोन्याचे दागिने घडविणे आणि विक्री करणे हाच त्यांचा मूळ व्यवसाय राहिला. महाराष्ट्रात ‘दैवज्ञ ब्राह्मण’ आणि ‘विश्वकर्मा सोनार’ हे दोन समाज सोन्या-चांदीच्या व्यवसायात पूर्वीपासून जम बसवून आहेत. ‘दैवज्ञ ब्राह्मण’ समाजाचे पूर्वज मूळचे गोवा, तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारी प्रदेशात वास्तव्यास होते. ‘दैवज्ञ’ हा शब्द कसा रूढ झाला, याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आढळतात. एका प्रवाहानुसार वेदीराजातीर्थ याच्या नेतृत्वाखाली ज्या समूहाने ‘मध्वा’ पंथ स्वीकारला, ते ‘दैवज्ञ’ होत. वेदीराजाचे अनुयायी म्हणून ‘दैवज्ञ’ शब्द रूढ झाला असावा, असे काहीजण मानतात. एक मतप्रवाह थेट वेदांपर्यंत पोहोचतो. काश्यपसंहितेत दैवज्ञांचा उल्लेख ‘अभियंते’ केल्याचे मत मांडले जाते.
‘विश्वकर्मा सोनार’ हे सृष्टीचा निर्माता असणाऱ्या विश्वकर्म्याचे पूजक होत. ‘विश्वकर्मा’ समाजात पाच पोटशाखांचा समावेश होतो. पृथ्वी निर्माण करताना पाच प्रकारचे तज्ज्ञ विश्वकर्म्याला मदत करीत होते. ते त्या काळचे अभियंतेच होते. त्यातील एक सोन्या-चांदीच्या वस्तूंची निर्मिती करणारा अभियंता होता. त्याचेच वंशज ‘विश्वकर्मा सोनार’ असे मानले जाते.
सोन्या-चांदीच्या व्यवसायाला आता वेगळीच झळाळी आली आहे. नडीअडीला पैसे उपलब्ध व्हावेत म्हणून पूर्वापार आपला समाज ‘गुंतवणूक’ म्हणून सोन्याकडे पाहत आला आहे. उदारीकरणाच्या जमान्यात शेअर मार्केटचा नूर पाहून ‘शेअर की सोने’ याचा निर्णय घेतला जात असल्यामुळे सोन्यातील गुंतवणुकीला वेगळेच परिमाण लाभले आहे. हजारो व्यावसायिक सोन्या-चांदीच्या व्यवसायात जम बसवून उन्नतीच्या शिखरावर पोहोचले आहेत. ‘घडव घडव रे सोनारा...’च्या काळापासूनच प्रतिष्ठेचा मानलेला हा व्यवसाय आणखी प्रतिष्ठेचा बनला आहे.

Web Title: Bhatav karva ray shahnara ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.