निष्ठावंत बाजूला अन् ‘भाव’ मात्र भलत्यांनाच!
By admin | Published: May 25, 2015 10:37 PM2015-05-25T22:37:33+5:302015-05-26T00:55:25+5:30
पंतांचा दौरा : ‘कमळ’ फुलविणारे मात्र सत्ताधाऱ्यांच्या बागेपासून दूर
सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सातारा जिल्हा दौरा जनतेसाठी आशादायी ठरला असला तरी जिल्ह्यात ‘कमळ’ कसेबसे वाचविणारे या दौऱ्यात बाजूलाच राहिले आहेत. वेळ मागून व भेटायला जाऊनही मुख्यमंत्र्यांना या कार्यकर्त्यांशी संवाद साधता आलेला नाही. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेले व महायुतीच्या घटक पक्षातीलच यावेळी खऱ्याअर्थाने ‘भाव’ खाऊन गेले. खटाव तालुक्यातील रणजितसिंह देशमुख हे तर मुख्यमंत्र्यांबरोबरच अनेक ठिकाणी दिसले. शेखर गोरे प्रतिष्ठानने तर मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. तर जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी स्नेहभोजन घेतले. हे बापू, भैया आणि भाऊच या दौऱ्यात अधिक ‘भाव’ खाऊन गेले, असेच म्हणावसे लागत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
कोल्हापूर येथे भारतीय जनता पक्षाचे तीन दिवसीय अधिवेशन होते. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. अधिवेशनानंतर त्यांनी सातारा जिल्ह्याच्या दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी दुष्काळी भागालाच प्राधान्य दिल्याचे दिसून आले. खटाव तालुक्यातील जाखणगाव येथे ‘जलयुक्त शिवार’ची तर माण तालुक्यात दहिवडी येथे जाऊन माणगंगा नदीची पाहणी केली. त्यानंतर सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर बैठक घेऊन विश्रामगृहावर मुक्काम केला.
मुख्यमंत्री विश्रामगृहावर असाताना अनेकांना त्यांना भेटूही दिले नाही. मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी नावे पाठविण्यात आली नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘आम्ही अनेक वर्षे भाजपात आहे. पक्ष टिकवून ठेवला आहे. तरीही आम्हाला वेगळी वागणूक का? मुख्यमंत्र्यांनी आमच्या अडचणी समजून घ्यायला हव्या होत्या. संवाद साधायला पाहिजे होता; पण तसे काहीच घडले नाही. त्यामुळे पक्षात आमचे स्थान काय,’ असा सवालही निष्ठावंतानी तेथेच केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात निष्ठावंत खऱ्याअर्थाने बाजूलाच राहिले; पण इतरच ‘भाव’ खाऊन गेले, अशी कैफियतही त्यांनी मांडली.
मुख्यमंत्र्यांच्या खटाव व माण तालुक्यांतील दौऱ्यात सध्या शिवसेनेत असलेले रणजितसिंह देशमुख हेच पुढे आल्याचे दिसून आले. कार्यक्रमात व दौऱ्यात ते मुख्यमंत्र्यांबरोबर होते. अनेक ठिकाणी त्यांची छबी पाहायला मिळाली. त्या तुलनेत भाजप पदाधिकाऱ्यांचे कोठेच अस्तित्व दिसून आले नाही.
त्याचबरोबर सध्या राष्ट्रीय समाज पक्षात असणारे माण पंचायत समितीचे सदस्य शेखर गोरे यांच्या प्रतिष्ठानने दहिवडी येथे मुख्यमंत्र्यांचा काठी अन् घोंगडे देऊन सत्कार केला. तसेच साताऱ्यातील नियोजित कार्यक्रमानंतर रविवारी रात्रीच्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस सध्या भाजपवासी झालेले दीपक पवार यांच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले होते. म्हणजे, एकूण दौऱ्यात भाजपमधील एकाही निष्ठावंतांचे दर्शन मुख्यमंत्र्यांबरोबर दिसून आले नाही. याची खंतही भाजपमधील अनेकजण व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)
राजीनाम्याचा निर्णय मागे
मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर भाजपमधील अनेक निष्ठावंत नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही, साधा संवादही साधला नाही, अशी खंत व्यक्त केली. सोमवारी तर भाजपच्या काही नाराज निष्ठावंतांनी आपली कैफियत उघड-उघड व्यक्त करताना पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पण, ऐनवेळी वरिष्ठांकडून राजीनामा देण्याचे काही करू नका, असे सांगण्यात आले. त्यामुळे राजीनामा देण्याविषयी माघार घेण्यात आली.