जिल्ह्यातील भिक्षेकर यांनाही मिळणार कोरोना लस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:39 AM2021-03-26T04:39:24+5:302021-03-26T04:39:24+5:30
लोकमत इफेक्ट लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू असून, यासाठी आधारकार्ड महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्यामुळे आधारकार्ड ...
लोकमत इफेक्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू असून, यासाठी आधारकार्ड महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्यामुळे आधारकार्ड नसल्याने भिक्षेकरी यांना लस मिळणार का? याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘आधारकार्ड नाही, भिक्षेकरी यांना लस कशी देणार!’ असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तानंतर मंत्रालय स्तरावर हालचाली होऊन भिक्षेकऱ्यांना लस मिळण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोराना लसीकरण सुरू झाले आहे. ६० वर्षांवरील आणि ४५ ते ५९ वर्षांपर्यंतच्या व्याधीग्रस्त नागरिकांना लस देण्यात येत आहे. यासाठी नोंदणी आवश्यक असून, त्यासाठी आधारकार्ड महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्याआधारे संबंधितांना कोरोना लसीकरण करण्यात येते. जिल्ह्यात भिक्षेकरी आणि बेघर असणारे अनेकजण आहेत. त्यांच्याकडे आधारकार्ड नाही तसेच इतर कागदपत्रेही नाहीत. त्यामुळे त्यांना कोरोना लस घेता येत नसल्याचे वास्तव होते. यामधील अनेकजण तर जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांच्या सेवा केंद्रात आहेत.
‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मंत्रालय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. संस्थेच्या सहाय्याने आधारकार्ड बनवायचे का दुसरा काही पर्याय निर्माण करायचा, यावर विचार सुरू आहे. त्यामुळे यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर भिक्षेकरी यांना कोरोना लस मिळणार आहे. यामुळे भिक्षेकरी आणि बेघर यांच्याबाबत आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
चौकट :
जिल्ह्यात अंदाजे भिक्षेकरी ७०
.........................................
बेघर निवाऱ्यात राहणाऱ्यांची संख्या
अंदाजे १२५
महिला २५
पुरुष १००
कोट :
जिल्ह्यात अनेक भिक्षेकरी आणि बेघर आहेत. काहीजण सामाजिक संस्थांमध्ये राहतात. यातील अनेकजण ६० वर्षांवरील आहेत. त्यांना कोरोना लस मिळायला हवी. पण, आधारकार्डची अडचण होती. आता शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्याने त्यांनाही लस मिळू शकते, असे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
- रवी बोडके, यशोधन ट्रस्ट, वेळे
.........................................................................