‘भीमाई’ पुरस्काराने समाजकार्याची उमेद वाढली
By admin | Published: December 6, 2015 10:35 PM2015-12-06T22:35:48+5:302015-12-07T00:27:23+5:30
मुक्ता दाभोलकर : ‘संबोधी’च्या वितरण सोहळ्यात अनेक सामाजिक विषयांना उजाळा
सातारा : संबोधी प्रतिष्ठानने दिलेल्या ‘मातोश्री भीमाई’ पुरस्काराने समाजकार्याची उमेद वाढली असून, यापुढील काळात डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे कार्य जोमाने सुरू ठेवणार असल्याचे मुक्ता दाभोंलकर यांनी सांगितले. पुरस्काराची पाच हजारांची रक्कम अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी खर्च करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.साहित्य, सांस्कृतिक तसेच समाजकार्यात कार्यरत असलेल्या व्यक्तीला संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने ‘मातोश्री भीमाई आंबेडकर’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाचा ‘मातोश्री भीमाई आंबेडकर’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका प्रज्ञा दया पवार यांच्या हस्ते रविवारी मुक्ता दाभोलकर यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मुक्ता दाभोलकार बोलत होत्या.हा कार्यक्रम विविध मान्यवर व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अण्णासाहेब होवाळे, दिनकर झिंब्रे, रमेश इंजे हे होते. या कार्यक्रमास डॉ. चित्रा दाभोलकर, ज्येष्ठ विचारवंत दत्तप्रसाद दाभोलकर, किशोर बेडकिहाळ ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अभय सरू, अभय कांता उपस्थित होते. (प्रतिनिधी)
डॉ. दाभोलकरांचे कार्य पुढे सुरू ठेवणार... ---संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने १८ वा ‘मातोश्री भीमाई आंबेडकर’ पुरस्कार मुक्ता दाभोलकर यांना देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप रोख पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे होते. पुरस्काराची रक्कम अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी खर्च करणार असल्याचे सांगून मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, ‘माझे बाबा डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी समाजातील अनेक लोकांशी आपली नाळ जोडली होती. त्यांनी सुरू केलेले अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य मी जोमाने पुढे सुरू ठेवणार आहे. संबोधी प्रतिष्ठान ज्या मुल्यांच्या आधारावर कार्य करीत आहे, त्यावरच मी काम करीत आहे. या पुरस्काराने मला त्यासाठीचे बळ मिळाले असून, उमेद वाढली आहे. मला हा पुरस्कार मिळाल्याने मी खरोखरंच भाग्यवान समजते.’
मुक्ता दाभोलकरांचे कार्य कौतुकास्पद
अध्यक्षीय भाषणात प्रज्ञा पवार यांनी मुक्ता दाभोलकरांचे कौतुक केले. तिला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे, ‘अत्यंत इष्ट अभिवाट आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांना ही खरी श्रद्धांजली ठरणार आहे. सध्याचा काळ स्त्रीविषयी हिंसाचार वाढण्याचा आहे. कौर्याला शौर्य समजून वाटचाल करणाऱ्या संघटना वाढल्या आहेत. असा आरोपही याप्रसंगी प्रज्ञा पवार यांनी केला.कार्यक्रमात दिनकर झिंब्रे, अण्णासाहेब होवाळे आदींनी मनोगत व्यक्त केले.