जलसंपदा मंत्र्यांची भीष्मप्रतिज्ञा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:40 AM2021-05-19T04:40:26+5:302021-05-19T04:40:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी जुलै महिन्यात नेर तलावात नेण्याची भीष्मप्रतिज्ञा जलसंपदा मंत्री जयंत ...

Bhishmapratijna of Water Resources Minister! | जलसंपदा मंत्र्यांची भीष्मप्रतिज्ञा !

जलसंपदा मंत्र्यांची भीष्मप्रतिज्ञा !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी जुलै महिन्यात नेर तलावात नेण्याची भीष्मप्रतिज्ञा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. यानिमित्ताने माजी पालकमंत्री विजय शिवतारे यांची पुन्हा एकदा आठवण झाली. त्यांनीदेखील अशीच भीष्मप्रतिज्ञा केली होती. सत्तेच्या पाच वर्षांच्या काळात त्यांची ही प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. आता एका महिन्यात नेरमध्ये पाणी पडले तर शेतकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटणार आहे.

कोरोना महामारीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पुणे, मुंबई अशा महानगरांमध्ये उपजीविकेसाठी गेलेले लोक नोकरी गमावल्याने किंवा व्यवसाय बुडाल्याने गावी परतण्याच्या विचारात आहेत. खटाव, माण या दुष्काळी तालुक्यांमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याने हजारो हेक्टर क्षेत्र पडून ठेवावे लागते. या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील शेतकरी चंद्रकांत दडस यांनी थेट जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी समाजमाध्यमांद्वारे संवाद साधला. मला शेती करायला गावी यायचे आहे; परंतु नेर धरणामध्ये जिहे कटापूर योजनेचे पाणी आले तर निश्‍चितपणे आम्ही शेती करू शकतो, असे त्यांचे ट्विट होते. त्यावर मंत्री जयंत पाटील यांनी जुलै महिन्यात नेरमध्ये निश्चितपणे पाणी जाईल, असा विश्वास त्यांना दिला. या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जुलै, ऑगस्टपासून त्यांच्या शेतांमध्ये विविध प्रयोग करता येऊ शकतील अशी अपेक्षा आहे.

दुष्काळी माण-खटाव तालुक्यांतील २७ हजार ५०० हेक्टर शेती क्षेत्रासाठी वरदान ठरणारी जिहे-कठापूर उपसा सिंचन योजना २० वर्षांची झाली आहे. जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेला ११ फेब्रुवारी १९९७ साली प्रशासकीय मान्यता मिळाली. २६९.०७ कोटी रुपयांचा हा मूळ प्रकल्प निधीटंचाईच्या चक्रव्यूहात सापडल्याने ही योजना पूर्ण करण्यासाठी तब्बल ५९० कोटी रुपयांची आवश्यकता लागली आहे. या प्रकल्पासाठी ३३९.०७ कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. अजूनही २५१ कोटी रुपयांचा निधी ही योजना पूर्ण करण्यासाठी लागणार आहे. या प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, ६२ कोटी ४० लाख इतक्या मंजूर मात्र अखर्चिक निधीला मान्यता मिळाली असल्याने योजनेचे काम पुढे सुरू आहे.

चौकट... १

अशी आहे योजना

- कृष्णा नदीचे पाणी जिहे-कठापूर येथून उपसा करून वर्धनगड बोगद्यातून नेर तलावात सोडायचे.

- नेर तलावातून उपसा करून आंधळी बोगद्यामार्गे आंधळी तलावात पाणी सोडायचे.

- दुसऱ्या बाजूला नेर तलावातून येरळा नदीत पाणी सोडायचे.

- या नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले असल्याने खटाव तालुक्यातील ११ हजार ७०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणायचे. तिथून ते येरळवाडी धरणात सोडायचे.

- आंधळी तलावातील पाणी माण नदीत सोडून पुढे ते राणंद धरणात न्यायचे.

- पुढे म्हसवडमधून हे पाणी म्हसवड तलावात सोडले जाणार आहे. या माध्यमातून माण तालुक्यातील १५ हजार ८०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

चौकट..२

कामाची सद्य:स्थिती

- कृष्णा नदीवरील कठापूर गावाजवळील बॅरेजचे काम ४५ टक्के पूर्ण

- पंपगृह १ चे काम सुरू असून ३५ टक्के, तर पंपगृह २ व ३ चे ९५ टक्के पूर्ण

- ऊर्ध्वगामी नलिकेचे १७.११ कि.मी.पैकी ११ कि.मी.चे काम पूर्ण

- वर्धनगड बोगद्याचे ९८ टक्के, तर आंधळी बोगद्याचे ७२ टक्के खोदकाम पूर्ण

- येरळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे १५ बंधारे पूर्ण. माण नदीवरील १७ पैकी १६ बंधारे पूर्ण

- १३२ केव्ही मुख्य पारेषण वाहिनीच्या उभारणीकरिता सर्व साहित्य प्राप्त

- टॉवर उभारणीचे काम ५० टक्के पूर्ण

- पंपगृहाचा टप्पा २ व ३ चे पंप व मोटर कार्यक्षेत्रावर उपलब्ध

Web Title: Bhishmapratijna of Water Resources Minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.