कुमठेत भोंदू महिलेचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2015 10:53 PM2015-06-03T22:53:07+5:302015-06-03T23:39:20+5:30
अंनिस-पोलिसांची कारवाई : महाराष्ट्र-कर्नाटकात जाळे; भाविकांची लुबाडणूक
तासगाव : करणी, भूतबाधा, सातीआसरा यासारखे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे अघोरी प्रकार करणाऱ्या कुमठे (ता. तासगाव) येथील मंगल पांडुरंग बडेकर (वय ६२) या भोंदू महिलेचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि तासगाव पोलिसांनी बुधवारी पर्दाफाश केला. या महिलेच्या कारनाम्यांचे जाळे महाराष्ट्रासह कर्नाटकातही मोठ्या प्रमाणात असून, तिच्याकडे येणाऱ्या लोकांची हजारापासून पाच हजार रुपयांपर्यंत लुबाडणूक केली जात असल्याचे उघड झाले आहे.
कुमठे येथील मंगल बडेकर ही महिला देवीच्या नावाच्या आधारे अंधश्रद्धा पसरविणारे उपाय करते व त्यासाठी ती पैसे घेत असल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडे आली होती. त्याची दखल घेत समितीच्या कार्यकर्त्यांनी भाविक म्हणून या महिलेशी संपर्क साधला. प्रत्येक रविवारी आणि मंगळवारी तिच्या घरी मोठा दरबार भरतो. या दरबारात जाऊन कार्यकर्त्यांनी मूल होत नाही, सासू त्रास देते, यावर उपाय सांगा, अशी विनवणी केली. त्यावर मंगल बडेकर हिने, सात शुक्रवार करा, परडी बांधून देईन, ती अमावास्येच्या रात्री नदीत सोडा. त्यासाठी अडीच हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. ‘मूल होण्यासाठी सातीआसराचे बंधन बांधून देईन, ते काढून देण्याची रक्कम नंतर सांगेन’, असेही तिने सांगितले.
हे उपाय योजण्यासाठी बुधवारी भेटतो, असे ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी तिला सांगितले होते. दरम्यान, तिच्याविरोधात तासगाव पोलिसांत ‘अंनिस’चे कार्यकर्ते डॉ. प्रदीप पाटील, अॅड. चंद्रकांत शिंदे, मधुकर पवार, प्रियांका तुपलोंढे, ज्योती अदाटे, जावेद पेंढारी, राणी कदम, पूर्ती पाटील यांनी तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संबंधित महिलेच्या घरी छापा
टाकला. (वार्ताहर)