भोसलेंनी संस्था मोडीत काढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:26 AM2021-06-28T04:26:41+5:302021-06-28T04:26:41+5:30
कऱ्हाड : ‘पुरोगामी विचारांच्या कारखान्याच्या संस्थापक सदस्यांनी शेतकऱ्यांचा आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास होऊन तो सबल होण्यासाठी कृष्णा ...
कऱ्हाड : ‘पुरोगामी विचारांच्या कारखान्याच्या संस्थापक सदस्यांनी शेतकऱ्यांचा आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास होऊन तो सबल होण्यासाठी कृष्णा कारखान्याबरोबरच कृषी उद्योग संघ, मयूर पोल्ट्री, फिडमिल, शिक्षण संस्था उभारल्या. मात्र, व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा असणाऱ्या भोसले यांनी या संस्था मोडीत काढल्या. तसेच खासगी करून सहकाराला मूठमाती दिली,’ असा आरोप कृष्णा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केला.
रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथे संस्थापक पॅनेलच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील, जयवंत जगताप, अजितराव पाटील, विनायक धर्मे आदींची उपस्थिती होती.
अविनाश मोहिते म्हणाले, ‘डॉ. भोसले यांच्या सरंजामशाहीमुळे कृष्णा उद्योग समूहातील सर्वच संस्थाचे अस्तित्व फक्त कागदावर उरले आहे. कृषीपूरक व्यवसाय संपुष्टात आले आहेत. शेतकरी कुटुंबातील हजारो कामगार बेकार झालेत. आज पोल्ट्री व्यवसायास चांगले दिवस आहेत. मात्र, कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांची शिखर संस्था असलेली मयूर कुक्कुटपालन संस्था मोडीत निघाल्याने शेतकऱ्यांना पोल्ट्री व्यवसाय करता येत नाही. हीच परिस्थिती कृषी उद्योग संघाची झाली. हा संघ बगलबच्च्यांशी केलेल्या उधारीच्या व्यवहारामुळे दिवाळखोरीत निघाला आहे.
अॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, ‘रयत कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर पडत असताना सभासदांना सहा महिन्यांपूर्वी एफआरपी इतका दर दिला. दुर्दैवाने राज्यात दोन नंबरचा साखर कारखाना असलेल्या कृष्णाने एफआरपीइतकाही दर दिला नाही. शासनाने कारखान्याच्या जप्तीची नोटीस काढली हे कशाचे द्योतक आहे. याचा कृष्णाच्या सुज्ञ सभासदांनी विचार करायला हवा. नोकरीसाठी लाचार बनू नका. आपले विचार गहाण टाकू नका. स्वत:च्या शेतात राबा. नोकरीपेक्षा जादा पगार पडेल.’
......................................................................