भोसले हे सहकार जिवंत ठेवणारे नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:34+5:302021-06-24T04:26:34+5:30
इस्लामपूर : ‘कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले हे सहकार जिवंत ठेवणारे नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच येत्या काळात ...
इस्लामपूर : ‘कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले हे सहकार जिवंत ठेवणारे नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच येत्या काळात कृष्णा कारखाना आणखी प्रगती करेल आणि त्यातून साहजिकच सभासद हित साधले जाईल,’ असा विश्वास सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र बर्डे यांनी व्यक्त केला.
जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्यावतीने वाटेगाव (ता. वाळवा) येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी सहकार पॅनलचे नेते डॉ. सुरेश भोसले, उमेदवार जितेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
बर्डे म्हणाले, ‘कृष्णा कारखाना हा लाखो माणसांच्या जीवनाला सर्वांगिण साथ देणारा कारखाना आहे. वारंवार होणाऱ्या सत्तांतरामुळे या कारखान्याचा विकास थांबला होता. पण गेल्या ६ वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या डॉ. सुरेश भोसले यांनी कारखाना सक्षमतेने तर चालविलाच शिवाय कारखान्याला अनेक क्षेत्रात अग्रेसर ठेवून सभासद हित साधले. येत्या काळातही सुरेश भोसलेंच्या नेतृत्वाखालीच कृष्णा कारखाना चांगली प्रगती करेल, याची खात्री असल्यानेच आम्ही सहकार पॅनलला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.’
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘२०१५ साली जेव्हा आम्ही सत्तेवर आलो तेव्हा कारखान्याची स्थिती अत्यंत बिकट होती. अशा स्थितीत काटेकोर नियोजन आणि पारदर्शी कारभार करून आम्ही कारखान्याला उर्जितावस्था आणली. गेल्या ६ वर्षांत सातत्याने सभासद हिताचा विचार करून मोफत साखर, उच्चांकी दर, कारखाना आधुनिकीकरण अशा अनेक पातळ्यांवर कारखान्याला अग्रेसर ठेवण्याचे काम आम्ही केले. कृष्णा कारखान्याची ही यशस्वी घोडदौड अशीच कायम ठेवण्यासाठी सभासदांनी सहकार पॅनलला साथ द्यावी.’
यावेळी प्रदीप चव्हाण, राहुल पाटील, जयवंत नांगरे, निवास शिंदे, हरिश्चंद्र औताडे, अशोक शेटे, कुणाल पाटील, संभाजी लोकरे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी :
वाटेगाव (ता. वाळवा) येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्यावतीने आयोजित प्रचार सभेत कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी मार्गदर्शन केले.