भोसलेंच्या ‘सहकार पॅनेल’ने फुंकले रणशिंग
By admin | Published: March 29, 2015 11:06 PM2015-03-29T23:06:33+5:302015-03-30T00:19:28+5:30
कृष्णा कारखाना : किल्ले मच्छिंद्रगडावर प्रचार व सभासद संपर्क अभियानाचा प्रारंभ
कऱ्हाड : येडेमच्छिंद्र, रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या येत्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने रविवारपासून प्रचाराचे रणशिंग फुंकले. डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते किल्ले मच्छिंद्रगडावर मच्छिंद्रनाथाला नारळ वाढवून आणि येडेमच्छिंद्र येथे क्रांतिसिंंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा आणि सभासद संपर्क अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी सहकार महर्षी दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या काळात कृष्णा कारखान्याला लाभलेला वैभवशाली काळ पुन्हा आणण्यासाठी सर्व सभासदांनी साथ द्यावी, असे आवाहन केले.
सकाळी दहाच्या सुमारास डॉ. सुरेश भोसले यांनी कार्यकर्ते आणि समर्थकांसमवेत किल्ले मच्छिंद्रगड येथे मच्छिंद्रनाथाची विधिवत पूजा केली. त्यानंतर येडेमच्छिंद्र येथे झालेल्या सभेत बोलताना ते म्हणाले, ‘दिवंगत जयवंतराव भोसलेंनी कृष्णा कारखान्याला स्थैर्य प्राप्त करून दिले होते. त्यांच्या काळात त्यांनी केवळ कारखान्याचाच विकास केला नाही, तर भागाचे आणि सभासदांच्या प्रगतीलाही चालना दिली. हाच वैभवाचा काळ पुन्हा आणण्यासाठी आम्ही या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा निर्णय घेतला आहे.’
‘सहकारात राजकारण बाजूला ठेवून आपण कार्यरत राहिलो तर सहकाराचा विकास होतोच; पण कारखान्यात १९८९ नंतर राजकारणाचा शिरकाव झाल्याने कारखान्याची पत हळूहळू ढासळत गेली. केवळ साखरेवर कारखानदारी चालणार नाही, तर उपउत्पादनेही घेण्याची गरज आहे, याचे महत्त्व जयवंतराव भोसलेंनी ओळखले होते. ज्या कारखान्याकडे वीजनिर्मिती करण्याची क्षमता आहे, याशिवाय डिस्टिलरी, इथेनॉलनिर्मिती करण्याची क्षमता आहे. तेथील शेतकरी सभासदांना मोठा मोबदला देणे शक्य आहे. कृष्णा कारखान्याच्या या जमेच्या बाजू असूनही गेल्या दहा वर्षांत याबाबत योग्य तऱ्हेचा विचार व कृती न झाल्याने सभासदांचे हित दुर्लक्षिले जात आहे.
सभासदांचे हित महत्त्वाचे मानल्याने आम्ही सत्ता नसताना कधीच कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला नाही. उलटपक्षी सभासदांना अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठीच प्रयत्न केले. येत्या निवडणुकीत आम्ही उमेदवार निवडीची जबाबदारी गावांवर सोपविली आहे. गावाने एकीने दिलेल्या व्यक्तीलाच उमेदवारी देणार आहोत.’
माजी जिल्हा परिषद सदस्य जगदीश जगताप म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांतील कारखान्याची वाटचाल पाहता यंदा बदल निश्चित आहे. आपल्याला स्वार्थासाठी पाच वर्षे निवडणून येणारे लोक आता सत्तेवर नको आहेत, तर ज्या जयवंतराव भोसलेंनी ३०-३५ वर्षे कारखान्याला भरभराटीचा काळ दिला, अशा विचारांना आता आपल्याला सत्तेवर आणायचे आहे. ’
बी. जी. पाटील म्हणाले, ‘सहकारासाठी जयवंतराव भोसलेंनी कृष्णा कारखान्याच्या रूपाने उभारलेल्या या स्मारकाला पुन्हा वैभवाचा काळ आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत.’
तांबवे येथील एल. एम. पाटील म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांच्या काळात कारखान्याच्या संचालक मंडळापासून अन्य बैठकांच्या नियोजनाचे काम हे बाह्यशक्तीच्या माध्यमातून झाले आहे. विद्यमान अध्यक्ष दुसऱ्याच्या सल्ल्याने काम करत असल्याने ‘आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातंय’ अशी अवस्था कारखान्याची झाली आहे.’
माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील, दिलीप पाटील, बाबासाहेब शिंंदे, श्रीरंग देसाई, पैलवान अप्पासाहेब कदम, दादासाहेब रसाळ यांचीही भाषणे झाली. यावेळी अप्पा नेर्लेकर, सर्जेराव पाटील, महिपतराव पाटील, एम. के. कापूरकर, सरपंच संजय पाटील, दयानंद पाटील, डॉ. राजेंद्र पवार, आनंदराव मोहिते, संजय पवार, संदीप मोहिते, बापूराव पवार, दामाजी मोरे, जगदीश पाटील, हणमंतराव पाटील, निवास पवार, बाळासाहेब पाटील आदींसह कार्यकर्ते आणि सहकार पॅनेल समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)