रिसवडला रस्त्याचे भूमिपूजन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:34 AM2021-03-14T04:34:20+5:302021-03-14T04:34:20+5:30
सुर्लीचा घाट धोकादायक कऱ्हाड : ओगलेवाडी ते सुर्ली घाटापर्यंत रस्त्याला अनेक वळणे आहेत. या धोकादायक वळणांमुळेच अपघात होत असून, ...
सुर्लीचा घाट धोकादायक
कऱ्हाड : ओगलेवाडी ते सुर्ली घाटापर्यंत रस्त्याला अनेक वळणे आहेत. या धोकादायक वळणांमुळेच अपघात होत असून, संबंधित ठिकाणी धोक्याची सूचना असणाऱ्या फलकांकडे रात्रीच्यावेळी लक्ष न गेल्यास वाहनचालकांचे अपघात होत आहेत. ओगलेवाडी ते सुर्ली मार्गावरच राजमाची गाव आहे. या गावानजीकच अनेक धोकादायक वळणे आहेत. या वळणावर अनेकजण वेगात वाहने चालवितात. अशात गाडीचा वेग नियंत्रित न झाल्याने अपघात घडत आहेत. तसेच हा रस्ता अरुंद व वळणाचा असल्याने जड वाहनांचा प्रवास धोक्याचा बनला आहे. मात्र, ही वाहनेही वेगाने चालविली जात असल्याचे दिसून येत आहे.
प्रवाशांचा जीव धोक्यात
पाटण : शहराच्या पश्चिमेकडील डोंगर माथ्यावरील टोळेवाडी, घेरा दातेगड अशी अनेक गावे वसलेली आहेत. या गावांतील ग्रामस्थांना सध्या जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या ठिकाणी डोंगर फोडून तयार केलेल्या या मार्गावर दरड कोसळून मातीचा ढिगारा रस्त्यावर आला आहे. रस्त्याच्या कडेला खोल दरी असून, येथून प्रवास करणे नागरिकांना धोकादायक बनले आहे.
वन्य प्राण्यांचा वावर
तांबवे : किरपे, तांबवे, येणके परिसरात सायाळासह वन्यप्राण्याचा वावर वाढला असून, त्यांच्याकडून पिकांचे नुकसान केले जात आहे. भुईमूग पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वनविभागातील अधिकाऱ्यांनी याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून केली जात आहे.
नागरिकांचा जीव मुठीत
कऱ्हाड : पुणे-बंगलोर महामार्गावर पाटण तिकाटणे येथे तिन्ही-चारही बाजूने एकत्रित रस्ता येत असल्याने या ठिकाणी रात्रीच्यावेळी छोटी-मोठी वाहने धडकून किरकोळ अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. परिणामी या ठिकाणी सायंकाळनंतर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. दिवसाही या ठिकाणाहून नागरिकांना आपला जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागत आहे.
पाणीपातळी खालावली
कार्वे : कऱ्हाड तालुक्यात कार्वे परिसरातील कोरेगाव, टेंभू, वडगाव हवेली, शेणोली शिवारातील डोंगरी विभागात विहिरीचे पाण्याची पातळी खालावली आहे. पाणी कमी असल्यामुळे विभागातील बागायती पीक क्षेत्रास पाणीपुरवठा अपुरा पडणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अपुऱ्या पाण्याचा शेतकऱ्यांना यंदा शेती उत्पादनात घट होण्याची चिंता निर्माण झाली आहे. शेतीला पाणी प्रमाणात उपलब्ध असेल तरच शेती उत्पादन मिळण्यास मदत होते.
उन्हाचा तडाखा वाढला
कऱ्हाड : शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये सध्या वातावरणात प्रचंड उष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळे या वाढलेल्या तापमानाचा नागरिकांना चांगलाच चटका बसत आहे. यावेळी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे. या तापलेल्या वातावरणाचा त्रास शेतकरी, नागरिकांना होताना दिसत आहे.
श्वानांचा उपद्रव वाढला
तांबवे : विजयनगरसह परिसरात मोठ्या संख्येने मोकाट श्वानांचा वावर आहे. त्याचा गावातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या श्वानांचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ, तसेच दुचाकीस्वारांतून होत आहे.