पोलीस चौकीत बिबटोबाची हजेरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:37 AM2021-01-20T04:37:56+5:302021-01-20T04:37:56+5:30
कोयनानगर : पोलीस चौकींना काहींना या ना त्या कारणाने हजेरी लावण्यास सांगितले जाते. त्यातूनही ती व्यक्ती न गेल्यास नोटीस ...
कोयनानगर : पोलीस चौकींना काहींना या ना त्या कारणाने हजेरी लावण्यास सांगितले जाते. त्यातूनही ती व्यक्ती न गेल्यास नोटीस येते. मात्र कोयना धरणाजवळील पोलीस चौकीत कसलेही आदेश नसताना चक्क बिबटोबा हजेरी लावण्यास आले. अचानक आलेल्या अनाहुत पाहुण्याला पाहिल्यानंतर पोलिसांचीही पाचावर धारण बसली. पटापट सर्व जण चौकीत गेले अन् दारं-खिडक्या लावून घेतल्या. काही वेळानंतर बिबटोबाची स्वारी आल्या पावली परतली.
याबाबत माहिती अशी की, कोयना धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध ठिकाणी पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. त्यातील २८ क्रमांकाच्या पोलीस चौकीत सातारा मुख्यालयाचे हवालदार डोंबे यांच्यासह त्यांचे सहकारी सोमवारी रात्री कर्तव्य बजावत होते. सारे काही व्यवस्थित सुरू असताना रात्री सव्वानऊच्या सुमारास पोलीस चौकीसमोर अचानक एक बिबट्या चालत आला. यामुळे कर्तव्यावरील पोलीस चांगलेच हादरले. सर्व कर्मचारी पटकन चौकीत गेले अन् दारे-खिडक्या बंद करून स्वत:ला कोंडून घेतले. काही वेळानंतर बिबट्या तेथून निघून गेला.
कोयना धरण परिसरात यापूर्वीही बिबट्यासह हिस्र वन्य प्राण्यांचे वारंवार दर्शन घडले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकामधे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २५ जून २०१९ रोजी पायथा वीजगृहाशेजारील चौकी शेजारी बिबट्या दिसल्याने पोलीस कर्मचा-याने स्वसंरक्षणासाठी हवेत गोळीबार केला होता. ४ मे रोजी कोयना धरणाच्या भिंतीवर बिबट्या दिमाखात चालत असल्याचे सीसी कॅमे-यात कैद झाले होते. तसेच २९ नोव्हेंबर रोजी धरणाच्या भिंतीशेजारी नऊ फुटांचा अजगर पकडला होता. कोयना धरण परिसरात रानडुक्कर, वानर, गव्यांसह इतर वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने पोलीस कर्मचारी, कोयना प्रकल्पाच्या कर्मचा-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कोयना अभयारण्यातील वन्य प्राणी मानवी वस्तीतून फिरत आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
२५ जून २०१९ रोजी पायथा वीजगृहाशेजारील चौकीशेजारी बिबट्या दिसल्याने पोलीस कर्मचा-याने स्वसंरक्षणासाठी हवेत गोळीबार केला होता.
फोटो १९ कोयनानगर-बिबट्या
कोयना धरण परिसरातील एका पोलीस चौकी परिसरात सोमवारी रात्री बिबट्या आला होता.