बिदालकर घेणार बिनविरोध ग्रामपंचायतींचा सत्कार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:54 AM2021-01-02T04:54:44+5:302021-01-02T04:54:44+5:30
दहीवडी : लोकसंख्येच्या बाबतीत तालुक्यात चौथ्या क्रमांकाचे असणारे व तालुक्यात दोन नंबरची मोठी ग्रामपंचायत म्हणून बिदाल ओळखली जाते. या ...
दहीवडी : लोकसंख्येच्या बाबतीत तालुक्यात चौथ्या क्रमांकाचे असणारे व तालुक्यात दोन नंबरची मोठी ग्रामपंचायत म्हणून बिदाल ओळखली जाते. या ग्रामपंचायतीत सलग ५३ वर्षे निवडणूक नाही. आरक्षण नसताना सर्व १३ महिला तसेच मागासवर्गीय सरपंच करून बिदालने महाराष्ट्रात नाव कमावले आहे. गावाच्या एकीतून आज लाखो रुपयांची कामे उभी राहिली. आज त्याचा लोकार्पण सोहळा ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झाला.
गावातील कचरा उचलण्यासाठी व झाडांना पाणी देण्यासाठी नवीन ट्रॅक्टर तसेच सर्व प्राथमिक शाळा डिजिटल करून त्यांना नवीन फर्निचर देण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी १ लाख ८७ हजार रुपये खर्चून ती दुरुस्त करण्यात आली. १४ कॉम्प्युटर ड्रेसकोड कपाट देण्यात आले. व्हाॅलिबाल साहित्य, क्रिकेटसाठी लागणारे साहित्य, बेघर वस्तीवर दोन लाईटचे हायमास्ट देण्यात आले. या सर्वाचा लोकार्पण सोहळा घेण्यात आला.
यावेळी गावच्या सरपंच गौरी जगदाळे, उपसरपंच सविता कुलाळ, ग्रामविकास अधिकारी भारत चव्हाण, माजी सभापती निवृत्ती जगदाळे, पंचायत समिती सदस्य सोमनाथ भोसले, माजी सरपंच शिवाजीराव जगदाळे, सुरेश जगदाळे, ताराचंद जगदाळे, प्रताप भोसले, तानाजी मगर, सतीश जगदाळे, रमेश जगदाळे, नंदकुमार चिरमे, माजी पोलीस अधिकारी गोरख बोराटे, पोलीसपाटील लखन बोराटे, बापूराव जगदाळे, शरद कुलाळ आदी उपस्थित होते.
चौकट...
‘एलआयसी’कडून बीमा ग्राम म्हणून घोषित !
यावेळी गावाचे एलआयसी प्रतिनिधी विजय धुमाळ यांच्या प्रयत्नातून बिदाल गावाला बीमा ग्राम गाव घोषित करण्यात आले. तसेच एलआयसीच्यावतीने १ लाख ५० हजार रुपये गावाच्या ग्रामपंचायतीला देण्यात आले असून, स्वागत कमानीसाठी त्याचा उपयोग करण्यात येणार आहे.
चौकट...
गावाची एकी आजही टिकून
सर्व निवडणुका अटीतटीने लढणारे बिदाल, ग्रामपंचायत मात्र बिनविरोध करते. गावाची एकी आजही टिकून असल्याने गावाने वॉटरकपमध्ये यश मिळवले. लोकवर्गणीतून कोट्यवधीची कामे केली. या संकल्पनेतून तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात, असे आवाहन बिदालकरांनी केले आहे. त्याचबरोबर बिनविरोध ग्रामपंचायतीचा सत्कार बिदालच्यावतीने करण्यात येणार आहे.