सत्ताधाऱ्यांना थोपविण्यासाठी वाईत ‘महाआघाडी’!
By admin | Published: January 20, 2016 11:38 PM2016-01-20T23:38:05+5:302016-01-21T00:26:05+5:30
असंतुष्ट नगरसेवकांवर नजर : पालिका निवडणुकीपूर्वी जोरदार राजकीय हालचाली; इच्छुकांची मोर्चेबांधणी
संजीव वरे -- वाई पालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची ऐन थंडीतही राजकीय कसरत सुरू झाल्याने शहराचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी तिर्थक्षेत्र आघाडीला निवडणुकीत आव्हान देण्यासाठी पारंपरिक विरोधक असलेल्या जनकल्याण आघाडीबरोबरच आता भाजप-शिवसेना-रिपाइंने दोन्ही आघाड्यातील असंतुष्ट नगरसेवकांना बरोबर घेऊन तिसरी ‘महाआघाडी’ तयार करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. या सर्वात संघर्ष समितीची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.वाई नगरपालिकेत सध्या आमदार मकरंद पाटील याचे नेतृत्व मानणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या तीर्थक्षेत्र आघाडीची सत्ता आहे. तर माजी आमदार मदन भोसले यांचे नेतृत्वाखालील जनकल्याण आघाडी विरोधी बाकावर काम करीत आहे. शेवटच्या कालावधीत तीर्थक्षेत्र आघाडीने आपला नगराध्यक्ष
न बदलता पालिकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करून शहराचा विकास, रस्ते, वैकुंठ स्मशानभूमी असे मोठे प्रकल्प मार्गी लावल्याचा संदेश वाईकरांपर्यंक पोहोचविला आहे. सत्ताधारी तिर्थक्षेत्र आघाडीतही अनेक गटतट व मतभेद आहेत. अनेकदा हे चौथऱ्यावरही आले आहेत. परंतु अंतिम क्षणी आमदारांचाच शब्द मानला जातो, हे ही खरे आहे.वाई शहरात सध्या प्रारूप आराखड्याच्या आरक्षणा विरोधात विरोधी जनकल्याण आघाडीने व संघर्ष समितीने चांगलेच रान उठविले असून, सत्ताधाऱ्यांना खिंडीत पकडले आहे. मात्र, गेल्या चार वर्षांच्या कालावधीत विरोधकांच्या कामगिरीविषयी वाईकर समाधानी नाहीत.
कृष्णा नदी प्रदूषण, महागणपती घाटावरील पर्यटकांसाठी स्वच्छतागृह, शहरातील वाहतूक व्यवस्था अशा कितीतरी समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले आहे. याचा असंतोषही नागरिकांच्या मनात आहे. शहराच्या विविध प्रश्नांवरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे बरेच राजकीय पाणी कृष्णेच्या पुलाखालून जाणार आहे.
इच्छुकांच्या गुडघ्याला बाशिंग!
आगामी काही महिन्यांत होणाऱ्या पालिका निवडणुकीच्या दृष्टीने अनेक इच्छुक उमेदवारांच्या राजकीय कसरती सुरू झाल्या आहेत. शहरात आता वाढदिवसाचे कार्यक्रम, राजकीय चर्चा, बैठका यांचा सपाटा सुरू झाला आहे. विरोधक व संघर्ष समितीच्या आव्हानाला सत्ताधारी कसे सामोरे जातात, हे ही आगामी काळात पाहावयास मिळणार आहे.
संघर्ष समितीच्या भूमिकेकडे लक्ष
विरोधी जनकल्याण आघाडी तसेच दोन्ही आघाडीत तीन असंतुष्ठ नगरसेवक आणि केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजप-शिवसेना व रिपाइं या सर्वांची तिसरी महाआघाडी निर्माण करण्यात संघर्ष समितीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नाट्यमय राजकीय घडामोडीत वाईकर नागरिक काय भूमिका घेतात? याचे उत्तर मात्र वेळेनुसार समोर येईल.