मोठे बाप्पा कायमस्वरूपी; छोटी मूर्ती विसर्जनाला!
By admin | Published: September 4, 2014 11:43 PM2014-09-04T23:43:25+5:302014-09-05T00:19:05+5:30
‘लोकमत’च्या प्रयत्नांना यश : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दिशेने साताकरांचे पाऊल...
सातारा : काळानुरूप होत असलेल्या बदलाचे वारे गणेशोत्सवालाही लागले आहे. उत्सवाबरोबरच गणेशमूर्तींनीही वेगळी ‘उंची’ गाठली आहे. त्यामुळे मूर्ती विसर्जनात अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती, केमिकलयुक्त रंग यांमुळे पाण्याचे प्रदूषण होऊन त्याचा माणूस आणि जलचरांनाही धोका निर्माण होत आहे. मूर्तीची हेळसांड होते. यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने ‘बाप्पांचे पावित्र्य जपू या’ सदराच्या माध्यमातून प्रबोधन केले. परिणामस्वरूप शहरातील अनेक मंडळांनी यंदापासून मोठ्या गणेशमूर्ती विसर्जित न करता ती कायमस्वरूपी ठेवण्याचा व छोट्या मूर्ती विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे.
जकातवाडीतील शिवशक्ती गणेशोत्सव मंडळाने १९ फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. या मूर्तीचे विसर्जन न करता ती कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. ६ रोजी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
शहरातील राजमुद्रा गणेशोत्सव मंडळानेही या वर्षीपासून गणेशमूर्ती विसर्जित न करण्याचा निर्णय घेतला आहे. २१ फूट उंच आणि सिंहासनाधिष्ठित सुबक मूर्ती आहे. उत्सवानंतर ही मूर्ती एका गोडावूनमध्ये सुरक्षित ठेवली जाणार आहे. पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय घेतला असून दरवर्षी जमा होणाऱ्या वर्गणीतून पर्यावरण, सामाजिक, शैक्षणिक कार्यासाठी काम करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष केदार राजेशिर्के, उपाध्यक्ष चिंतामणी महाबळेश्वरकर यांनी सांगितले. मूर्तिकार संतोष कुंभार यांनी ही मूर्ती बनविली आहे. उत्सवानंतर त्यांच्याकडेच शेडमध्ये मूर्ती ठेवली जाणार आहे.
सम्राट गणेशोत्सव मंडळ दरवर्षी सर्वांत मोठ्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करते. या वर्षीही १८ फूट उंचीच्या मूर्ती बसविण्यात आली आहे. या मूर्तीचे तळ्यात विसर्जन केले जाते. मात्र, यापुढे या मंडळानेही मोठ्या मूर्तीचे विसर्जन न करता ती कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक वर्षी नव्याने रंगकाम करून एकच मूर्ती प्रतिवर्षी बसविणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.
शनिवार पेठेतील नवमहाराष्ट्र गणेशोत्सव मंडळानेही गणेशमूर्ती विसर्जित न करण्याचा निर्णय घेतला आहे. या मंडळाने यंदा २० फुटी गणेशमूर्ती बसविली आहे. मूर्ती ठेवण्यासाठी शेड तयार केले जाणार असल्याचे अध्यक्ष अमर परदेशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘चला बाप्पांचं पावित्र्य जपू या’ सदरामुळे सातारकरांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवासंदर्भात जागृती निर्माण झाली आहे. ‘पीओपी’च्या गणेशमूर्तींमुळे जलप्रदूषण होऊन त्याचा भविष्यात केवढा धोका निर्माण होऊ शकतो, हे आता सातारकरांना कळून चुकले आहे. दरवर्षी शहरातील तळ्यांमध्ये मूर्ती विसर्जन होत असल्यामुळे पाण्याचे प्रचंड प्रमाणात प्रदूषण होऊन पाण्यातील मासे व इतर जलचरांचे जीवन संपुष्टात येत असल्याची उदाहरणे घडली आहेत. मूर्ती विसर्जनानंतर तळ्यांची स्वच्छता हा गंभीर प्रश्न निर्माण होत असतो. यासाठी लाखो रुपयांचा निधी पालिकेला खर्ची घालावा लागतो, शिवाय तळ्यांच्या परिसरातील लोकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर येतो. यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने या गंभीर समस्येकडे डोळसवृत्तीने पाहण्याचे आवाहन केले अन् त्याला सातारकरांनी प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. भविष्यात जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मंडळाचे अध्यक्ष सागर मोहिते, उपाध्यक्ष तुषार मोहिते आणि सदस्यांनी १९९१ मध्ये गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून गणेशोत्सवात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. येथून पुढेही जमा होणाऱ्या वर्गणीचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करणार आहे.
-विकास यादव,
सदस्य