खेळी बड्या नेत्यांची; ससेहोलपट प्याद्यांची
By admin | Published: July 6, 2014 11:20 PM2014-07-06T23:20:40+5:302014-07-06T23:26:57+5:30
सत्तेचा सारीपाट : पाटण तालुक्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
पाटण : पाटण तालुक्यात दोन गट आणि दोन बडे नेते यांच्या इशाऱ्यावर तालुक्याची बेरीज-वजाबाकी सुरू असते. विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर आल्याने याच हालचालींना वेग आला आहे. घाईगडबडीतून पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन झाले. सत्तेच्या सारीपटावर बड्या नेत्यांची खेळी झाली; मात्र काही प्याद्यांची ससेहोलपट झाली.
पाटण तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या उद्घाटनावरून राजकारण तापायला लागले आहे. या प्रकरणात सापडलेले अधिकारी मूळचे पाटण तालुक्यातील रहिवासी आहेत. ते अनेक वर्षे एकाच ठिकाणी काम करत आहेत, असा आरोप झाला. त्यात त्यांच्या डोक्यावर म्हणे राजकीय वरदहस्त आहे.
मग समोर कोणीही असो, सभापती किंवा उचापती? त्यांना घाईवर आणण्याचे काम फत्ते झाले. मात्र, तालुक्यातील दोन बडे नेते बाजूने असल्यावर काय कोणाची भीती?
पाटण तालुक्यातील प्रशासन तर एका नेत्याच्या इशाऱ्यावर अंगा, खांद्यावर खेळत आहे. तर दुसऱ्या नेत्याच्या आक्रमकपणामुळे थरथर कापतंय. एका नेत्याची सत्ता अनेक वर्षांपासूनची असल्यामुळे अधिकाऱ्याच्या अंगवळणी पडलेली आहे.
अधिकारी सांभाळण्याची कला जोपासण्यात एका गटाने चांगलीच बाजी मारली आहे. दुसरा नेता सडेतोड आहे, त्याची सत्ता पंचायत समितीत आहे.
आमदार असताना सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी अधिकाऱ्यांना ‘सळो की पळो’ करून सोडणारा हा नेता. पंचायत समितीतही असाच प्रकार झाला. (प्रतिनिधी)