तोट्या नसलेल्या नळांमुळे मोठा तोटा
By admin | Published: May 12, 2016 10:12 PM2016-05-12T22:12:59+5:302016-05-12T23:44:15+5:30
सातारकरांचा पुढाकार : सदरबझार परिसरात स्वखर्चाने केली नळांची दुरुस्ती
सातारा : ‘पाणी म्हणजे जीवन. पाण्याशिवाय जीवसृष्टीची कल्पनाही कोणी करू शकत नाही,’ असे आपण नेहमी म्हणत असतो; पण पाणी वाचविण्याबाबत आपण नेहमीच टाळाटाळ करत असतो. पण आता पाण्याचे महत्त्व आता कळून चुकल्याने सातारा शहरातील युवक, महिला पाणीबचतीसाठी विविध उपाय करत आहेत. काही नागरिकांनी शहरातील विविध भागांतील नळांना तोट्या बसवून वाया जाणारे पाणी वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.जलसाक्षरतेसाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘जलमित्र अभियाना’ला विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे पाण्याचे मोल समजू लागले आहे. त्यामुळे पाणीबचतीची चळवळ सुरू झाली आहे. ‘जलमित्र अभियान’अंतर्गत साताऱ्यातील निमिश शहा यांनी मित्रांना घेऊन सदर बझार येथील हाउसिंग सोेसायटी, बंगले, झोपडपट्टी या भागांत फिरून तोट्या नसलेल्या नळांचा सर्व्हे केला. त्यानंतर एक प्लंबर बरोबर घेऊन त्यांनी जवळपास वीस नळांना तोट्या बसविल्या. तसेच लिकेजही काढण्यात आले आहे.घरात असलेल्या नळांनाही अनेकजण तोट्या बसवित नाहीत. यासाठी कविता शहा, प्रदीप कामटे हे जलमित्र बनून पाणीबचतीचे आवाहन करत आहेत. (प्रतिनिधी)
मोफत प्लंबरची सोय
आजही शहरात अनेक ठिकाणी नळांना तोट्या नसल्यामुळे पाणी वाया जाते. अशा नळांचा सर्व्हे करून आम्ही त्यांना तोट्या बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. तसेच प्लंबरला बरोबर घेऊन नळांचे लिकेजही काढत आहे. यामुळे काही प्रमाणात पाणीबचत होणार आहे.
- निमिश शहा, सातारा
पाणीबचतीचे आवाहन
दुष्काळामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे गरजेचे आहे. याबाबत जलमित्र म्हणून नातेवाइक, मित्रपरिवार यांना नळांना तोट्या बसविण्याबरोबरच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत आवाहन करत आहे.
- प्रदीप कामटे, सातारा