महायुतीत घडामोडी; आघाडीत हालचाली !

By admin | Published: August 31, 2014 09:37 PM2014-08-31T21:37:33+5:302014-09-01T00:05:14+5:30

वाई विधानसभा मतदारसंघ : इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

Big-ticket events; Frontline movements! | महायुतीत घडामोडी; आघाडीत हालचाली !

महायुतीत घडामोडी; आघाडीत हालचाली !

Next

खंडाळा : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या वाई विधानसभा मतदारसंघात गेल्या महिन्याभरात झालेल्या अनेक घडामोडींमुळे राष्ट्रवादी स्थिर, शिवसेना तेजीत तर कॉँग्रेस संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. महायुतीतील हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असल्याने इच्छुकांनी मात्र मोर्चेबांधणीला जोरदार तयारी केली आहे.
वाई विधानसभा मतदारसंघात गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने बंडखोरी करीत अपक्षाच्या रूपाने विजयश्री खेचून आणली होती. गेल्या पाच वर्षांत आमदार मकरंद पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघात विकासकामांचा झंझावात उभा करीत राष्ट्रवादीची ध्येयधोरणे गावागावांत पोहोचविली आहेत तर काँग्रेसच्या ताब्यात हा मतदारसंघ असतानाही माजी आमदार मदन भोसले यांच्या भुमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आता विधानसभा जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या तयारीला वेग दिला आहे.
दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेने जिल्हा संघटनेत मोठे बदल करीत खंडाळा तालुक्यातील नंदकुमार घाडगे यांची जिल्हाप्रमुखपदी, प्रदीप माने यांनी उपजिल्हाप्रमुखपदी तर शारदा जाधव यांची जिल्हा महिला संघटकपदी संधी देऊन वाई मतदारसंघात परिवर्तन घडविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळेच तालुक्यात शिरवळ, लोणंदसह अनेक गावांत शिवसेनेच्या शाखा उद्घाटनांसह इतर पक्षातील कार्यकर्त्यांना सेनेत प्रवेश दिला गेला. या घडामोडींमुळे तालुक्यात पुन्हा भगव्याचा प्रभाव वाढला आहे. ही मोट बांधण्यात नूतन पदाधिकाऱ्यांची धडपड कामी आली आहे.
वाई मतदारसंघ काँग्रेसकडे होता तो राष्ट्रवादीकडे राहणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील बैठकीत सांगितल्याने आमदार मकरंद पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आमदार फंडातून आजपर्यंत झालेल्या कामांचे भूमिपूजन, उद्घाटन अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रवादी चार्ज होत आहे.
दुसरीकडे शिवसेनेने सुरुंग लावत राष्ट्रवादीचे बुरुज भेदायला सुरुवात केली आहे. मात्र, मदन भोसले यांना अनेकांनी भाजप प्रवेशाचे साकडे घातल्याने काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांसह कार्यकर्त्यांना महायुतीचे वेध लागले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
काँग्रेसच्या झालेल्या संवाद मेळाव्यात काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी ऐकण्याची भूमिका पार पाडली असली तरी राज्यातील जनतेचा कल लक्षात घेऊन मदन भोसले यांनी भाजपच्या तिकिटावर लढावे, अशी अटकळ बांधली असल्याने सध्या काँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे तर सेनेचे उपजिल्हाप्रमुख असलेले प्रदीप माने यांनी आपण विधानसभा लढण्यास इच्छुक असून, तिकीट मिळण्यासाठी रितसर पक्षाकडे अर्ज दाखल केला आहे.
विधानसभेचा मनसुबा आखून प्रदीप माने यांनी आपल्या मोर्चेबांधणीला जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे
तालुक्याच्या राजकीय पटलावर
सध्या बलबलांना वेग आला
आहे. (प्रतिनिधी)

मतदारसंघासाठी लक्षवेधी निवडणूक
आमदार मकरंद पाटील यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मदन भोसले यांना अनेकांनी भाजप प्रवेशाचे साकडे घातल्याने कार्यकर्त्यांना महायुतीचे वेध लागले आहेत. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख असलेले प्रदीप माने यांनी तिकीट मिळण्यासाठी रितसर पक्षाकडे अर्ज दाखल केला आहे. दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेने जिल्हा संघटनेत मोठे बदल केले. खंडाळा तालुक्यातील तिघांना संधी देऊन वाई मतदारसंघात परिवर्तन घडविण्याचा निर्धारही केला आहे. शिवसेनेच्या जिल्हा संघटक शारदा जाधव यांची नारीशक्ती पक्षासाठी पाठबळ ठरत आहे. याबरोबर मनसेचे तालुकाप्रमुख आदेश जमदाडे हेही विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ही निवडणूक वाई मतदारसंघासाठी लक्षवेधी ठरणार आहेच; तसेच कार्यकर्त्यांच्या निष्ठा अजमावणारी ठरणार आहे.

Web Title: Big-ticket events; Frontline movements!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.