दुचाकीस्वार सुसाट.. भीती व्यापाऱ्यांच्या गोटात
By admin | Published: March 29, 2015 10:12 PM2015-03-29T22:12:51+5:302015-03-30T00:25:45+5:30
ढेबेवाडीतील स्थिती : मुख्य बाजारपेठेत भरवेगात वाहने; कर्कश हॉर्नमुळे व्यापारी, विक्रेत्यांसह ग्रामस्थ त्रस्त
सणबूर : ढेबेवाडी येथे रहदारीच्या रस्त्यावर धूमस्टाईल दुचाकी चालविणाऱ्यांना जोर आला आहे. एस. टी. स्टँड परिसर, बाजारपेठ रस्ता, कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनिअर कॉलेज परिसरात वेगाने दुचाकी चालवून कर्णकर्कश हॉर्न वाजवून काहीजण हिरोगिरी करीत आहेत. याचा नाहक त्रास ग्राहस्थांना सहन करावा लागत आहे. ढेबेवाडी हे विभागातील मध्यवर्ती बाजारपेठेचे ठिकाण असून, या ठिकाणी कॉलेज, बँका, शासकीय कार्यालये, वैद्यकीय सुविधा याठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे नेहमीच रस्त्यावर पादचाऱ्यांची गर्दी दिसून येते. एस. टी. स्टँड परिसर तसेच बाजारपेठ रस्त्यावर दुतर्फा दुकाने असल्याने खरेदीविक्रीसाठी नेहमीच हा परिसर गजबजलेला असतो. त्याचबरोबर विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनीही येथे शिक्षणासाठी येत असतात. डोंगरदऱ्यातून दुर्गम भागातून शिक्षणासाठी ढेबेवाडी येथे येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या पालकांना आपला पाल्य घरी सुखरूप येईपर्यंत नेहमीच चिंता लागलेली असते. शहराच्या ठिकाणी अनेक वाईटप्रवृत्ती बळावत असताना खेडेगावामध्येही असुरक्षिततेचा अनुभव नेहमीच येत असतो. ढेबेवाडी येथे पोलीस स्टेशन असून, साठ ते सत्तर गावे या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. दुर्गम परिसर, धरणग्रस्तांची आंदोलने, डोंगरमाथ्यावरील पवनचक्कीच्या ठिकाणी गुंडांचा उपद्रव अशा अनेक समस्यांवरती मात करत विभागामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कांबळे यांच्यासह कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. मात्र, हे करीत असताना पोलिसांचे धूमस्टाईल दुचाकीस्वारांकडे दुर्लक्ष होत आहे. खराब रस्ते, वाढती वाहनांची संख्या व वेगाने बेदरकारपणे ट्रिपल सीट दुचाकी चालविणारे तरुण यामुळे येथे अपघातांची संख्याही वाढलेली दिसून येते. रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक निरपराध पादचाऱ्यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. येथे सध्या धूमस्टाईल दुचाकी चालविण्याच्या प्रवृत्तीत वाढ झाली आहे. अगदी रात्रीच्या वेळी सुद्धा पेठेच्या रस्त्यावर बेफाम दुचाकी चालवून, कर्कश हॉर्न वाजवून धुमाकूळ घालणाऱ्या रोडरोमिओंच्या मुसक्या पोलीस यंत्रणेने आवळाव्या, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. या रोडरोमिओंना अनेक ग्रामस्थांनी समजुतीने सांगण्याचा प्रयत्न केला. तरी त्यांची दादागिरी वाढतच चालली आहे. (वार्ताहर) एरव्ही नोकरी, सुटीत मौजमजा ढेबेवाडी विभागातील अनेक तरुण नोकरीसाठी मुंबई येथे वास्तव्यास असतात. परंतु सुटीमध्ये गावाकडे आल्यानंतर अनेकजण मौजमजा करण्यावर भर देतात. येथे फोफावलेल्या ढाबा व बार संस्कृतीमुळे तरुणांचा वेग अधिकच वाढत असल्याचे दिसते. ढेबेवाडी पोलिसांनी वारंवार वाहनांची कागदपत्रे तपासण्याची मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. तसेच विनापरवाना किंवा मद्यप्राशन करून दुचाकी चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. रात्रीच्या वेळी चारचाकी वाहने रस्त्यावर उभी केली जात असून, गाडीतील टेपचा आवाज मोठ्याने केला जात असल्यामुळे त्याचा नाहक त्रास ये-जा करणाऱ्या लोकांना होत आहे. तो थांबला पाहिजे. - संजय लोहर उपसरपंच, मंद्रुळकोळे खुर्द