बळीराजाने केली बैलांची खांदमळणी
By admin | Published: July 28, 2015 11:27 PM2015-07-28T23:27:13+5:302015-07-28T23:27:13+5:30
आज बेंदूर : सणाच्या पूर्वसंध्येला खांद्याला तूप-हळदीचा लेप
जावेद खान- सातारा -वर्षभर मानेवर जू घेऊन बळीराजाबरोबर शेतात राबणाऱ्या बैलांच्या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बेंदूर. आज (बुधवार) मोठ्या धामधुमीत बेंदूर सण साजरा करण्यासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. सणाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांची तूप व हळद लावून खांदमळणी केली. आधुनिक युगात यंत्राच्या साह्याने शेती करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे जनावरांची संख्या घटली आहे. ग्रामीण भागात बैलजोडी पाहायला मिळते. शेतकऱ्यांबरोबर शेतात नांगरणी, पेरणी, अशी कष्टाची कामे करणाऱ्या बैलांसाठी बेंदूर हा सजण्याचा व मिरविण्याचा दिवस. आपल्या खांद्यावर बोजड अवजारे घेऊन बैल शेतात राबतो. म्हणून बेंदराच्या आदल्या दिवशी शेतकरी बैलांची खांदमळणी करतात. बैलांच्या खांद्याला आराम मिळावा म्हणून तूप व हळद लावून मालीश केली जाते. त्यानंतर गरम पाण्याने पाय शेकले जातात. सायंकाळी त्यांना कणखीचे गोळे, उकडलेली बाजरी, गूळ, पेंड असा खुराक दिला जातो. तसेच सणाला रुबाब वाढावा म्हणून बैलांना सजविले जाते. शिंगांना बेगडी कागद, अंगावर विविध प्रकारचे रंगीत छाप उमटविले जातात. शिंगांना फुगे बांधले जातात. त्यानंतर गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते.
शेतकरीही पुजतोय मातीचे बैल!
आधुनिक शेतीचा परिणाम : गावोगावी बैलांची संख्या घटली
गुलाब पठाण ल्ल किडगाव
आषाढी एकादशी संपताच शेतकऱ्यांबरोबरच चिमुकल्यांना वेध लागतात ते बेंदूर सणाचे. मात्र, आधुनिक काळात गावोगावच्या बैलांची संख्या घटल्याचे दिसत असून ‘सर्जा-राजा’ची जागा आता टॅक्टरने घेतल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही आता मातीचे बैल पुजावे लागत आहेत.
पूर्वी गावाकडे प्रत्येकाच्या दावणीला बैलजोडी असायची. मात्र, बागायत शेतीचे प्रमाण वाढल्यामुळे झटपट पैसा मिळवून देणाऱ्या नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कमी कालावधीची पिके घेऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनत चालला आहे. त्यामुळे प्रगतशील शेतकरी बैलांऐवजी आता ट्रॅक्टरच्या साह्याने शेती करू लागला आहे. बेंदूर सणाला पूर्वी बैलांची गावातून वाजतगाजत मिरवणू काढली जायची. दुपारपासूनच मिरवणुकीला सुरुवात व्हायची. आता चिमुकल्यांना मातीच्या बैलांना रंग देऊन त्यांची घरातच पूजा करण्यात समाधान मानावे लागत आहे. आता कुठे फारशा बैलगाड्याही पाहायला मिळत नाहीत. आधुनिक शेतीच्या काळात मात्र ‘सर्जा-राजा’ची जोडी दिसेनाशी झाली आहे.
म्हणे बैलांना काम उरले नाही...
ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे झटपट होतात. बैल घ्यायचा म्हणजे त्याची किंमत पन्नास हजारांच्या घरात असते. शिवाय त्याला पोसण्याचा खर्च मोठा आहे. वर्षभर पेंड, कडबा यासाठी सहा ते सात हजार रुपये खर्च येतो. आता बागायती शेती असल्यामुळे बैलांना फारसे काम उरले नाही. वर्षातून पंधरा दिवस औताला जुंपले जाते. त्यामुळे वर्षभर बैल बांधून पोसण्यापेक्षा शेतकरी ट्रॅक्टर घेणे पसंत करत आहेत.