अब्जाधीश उदयनराजे! आहेत खानदानी श्रीमंत; ट्रॅक्टरपासून फॉर्च्युनरपर्यंत, वाहनांचा ताफा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 06:03 AM2024-04-20T06:03:01+5:302024-04-20T06:03:50+5:30
खासदार उदयनराजे भोसले हे खानदानी श्रीमंत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: खासदार उदयनराजे भोसले हे खानदानी श्रीमंत आहेत. त्यांना वारसाहक्काने मोठ्या प्रमाणावर जमीन आणि संपत्ती मिळाली आहे. त्याबरोबरच त्यांनी स्वकर्तृत्वानेदेखील त्यामध्ये भर टाकली आहे. एकूण मालमत्तेचा विचार करता ते अब्जाधीश आहेत.
वारशानेच आहेत अब्जाधीश
त्यांना वारशानेच १ अब्ज ७२ कोटी ९४ लाख ४९ हजार रुपयांची संपत्ती मिळाली आहे, तर त्यांच्याकडे स्वत:ची १६ कोटी ८५ लाख ७७ हजार ४८ रुपये एवढी जंगम मालमत्ता आहे. २०१९ च्या तुलनेत त्यामध्ये चार कोटींनी वाढ झाली आहे. महागडी वाहने आणि हिरे, मोती, सोन्याचे दागिने याबाबत तर त्यांचा खानदानी रुबाब दिसून येतो. त्यांच्याकडे अगदी ट्रॅक्टरपासून ते जिप्सी, मर्सिडीज, फॉर्च्युनर, ऑडी, स्कॉर्पिओ अशी विविध प्रकारची वाहने आहेत, तर २ कोटी ६० लाख ७४ हजार ३९८ रुपयांचे जडजवाहिर, सोने, चांदीचे दागिने आहेत. असे असले तरी सुमारे २ कोटी ४४ लाख ६३ हजार ८४२ रुपयांचे कर्ज आहे, तर चार फौजदारी खटले प्रलंबित आहेत.
संजय पाटील यांच्याकडे ४८ कोटींची संपत्ती
सांगलीतून दोन वेळा निवडून आलेले आणि तिसऱ्यांदा मैदानात उतरलेले खासदार संजय पाटील यांच्या नावावर स्थावर आणि जंगम मालमत्ता ४८ कोटी ३१ लाख ३९ हजार रुपये इतकी आहे. पत्नीची जंगम मालमत्ता तब्बल ३० कोटी ५० लाखांनी अधिक आहे. पत्नी ज्योती यांनी जंगम मालमत्तेपैकी ३२ कोटी ३१ लाख रुपये असुरक्षित कर्ज म्हणून एसजीझेड ॲण्ड एसजीए शुगर कंपनी तुरचीला दिले आहेत.
विशाल पाटील यांची संपत्ती ३० कोटींवर
काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांची संपत्ती ३० कोटी ५२ लाख ४१ हजार ७३५ रुपयांची आहे. मागील लोकसभा निवडणुकीतील आकडेवारीच्या तुलनेत ८ कोटी ८० लाख ८४ हजार ७९९ रुपयांनी संपत्तीत वाढ झाली आहे.