मलकापुरात घनकचऱ्यापासून सेंद्रिय खतासह बायोगॅसनिर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:37 AM2021-05-15T04:37:53+5:302021-05-15T04:37:53+5:30
मलकापूर : येथील पालिका घनकचऱ्यापासून सेंद्रिय खतासह बायोगॅसनिर्मिती व गॅसनिर्मितीतून वीजनिर्मिती करीत आहे. ‘पूर हरित महासिटी कंपोस्ट खत’ या ...
मलकापूर : येथील पालिका घनकचऱ्यापासून सेंद्रिय खतासह बायोगॅसनिर्मिती व गॅसनिर्मितीतून वीजनिर्मिती करीत आहे. ‘पूर हरित महासिटी कंपोस्ट खत’ या नावाने ओळख असलेल्या या खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिसरातील शेतीला दर्जेदार सेंद्रिय खत मिळत असून, प्रतिकिलो पाच रुपयांप्रमाणे या खताची विक्री होत आहे. कोरोना काळातही या खतापासून पालिकेला वार्षिक सुमारे तीन लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे हे वाढत्या शहरीकरणापुढील महत्त्वाचा प्रश्न ओळखून ‘मलकापूर शहर, स्वच्छ व सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी पालिकेने घनकचरा व्यवस्थापनाची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. शहरातील ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी दहा हजार घरांसाठी वीस हजार बकेट मोफत दिल्या आहेत. प्रत्येक घरातूनच ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून शंभर टक्के घरातील कचरा गोळा करण्याची व्यवस्था पालिकेने केली आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन म्हणून तीन काेटींचा रोटरी ड्रम पद्धतीचा आधुनिक प्रकल्प उभा केला आहे. कोरोना महामारीच्या काळातही शहरातून दररोज १० ते १३ टन ओला व सुका कचरा गोळा केला जातो. घनकचरा व्यवस्थापन केंद्रात आलेल्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करून विघटित कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती केली जाते. दररोज साडेपाच टन खताची निर्मिती होते. या खताचा वापर सेंद्रिय खत म्हणून शेतीसाठी होत आहे. या खताची प्रति पाच रुपये किलोने विक्री केली जाते. त्यातून सुमारे ३ लाखांचे उत्पन्न पालिकेला मिळत आहे.
‘मलकापूर हरित महासिटी कंपोस्ट’ नावाने पालिकेच्या खताचा ब्रँड तयार करण्यात आला आहे, तर उर्वरित कचऱ्यापासून बायोगॅसनिर्मिती व त्याच गॅसवर वीजनिर्मिती करण्याचे प्रकल्प उभे केले आहेत. त्यामुळे पालिका आत्मनिर्भर होण्यासाठी सज्ज होत आहे.
चौकट
कागदी पुठ्ठे व रद्दीपासून दोन लाखांचे उत्पन्न
साधारणतः शहरातील घराघरातून वर्गीकरण करूनच कचरा संकलन होते. सुक्या कचऱ्यातील कागदी पुठ्ठे, तसेच रद्दी ही वेगवेगळी करूनच जमा होते. कागदी पुठ्ठे, तसेच रद्दीपासून पालिकेला जवळ-जवळ दोन लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.
चौकट
कचरा वर्गीकरणात ९५ टक्के उद्दिष्ट पूर्ण
पालिकेने कचरा वर्गीकरण व संकलनाचे विशेष नियोजन केले आहे. ९ घंटागाड्या व ४ ट्रॅक्टरच्या मदतीने नित्यनेमाने कचरा संकलन केले जात आहे. त्यामुळे कचरा वर्गीकरणात ९५ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.