कुसुंबीमुऱ्याच्या चिमुकल्यांकडून पक्षीसंवर्धन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:39 AM2021-03-05T04:39:29+5:302021-03-05T04:39:29+5:30
पेट्री : कासपठाराच्या कुशीत डोंगरमाथ्यावरील प्राथमिक शाळेतील कुसुंबीमुऱ्याच्या चिमुकल्यांचे हात गेल्या महिन्याभरापासून पक्ष्यांना पाणी व खाद्य उपलब्ध करून ...
पेट्री : कासपठाराच्या कुशीत डोंगरमाथ्यावरील प्राथमिक शाळेतील कुसुंबीमुऱ्याच्या चिमुकल्यांचे हात गेल्या महिन्याभरापासून पक्ष्यांना पाणी व खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी सरसावले होते. या चिमुकल्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला पक्षीसंवर्धनाचा ध्यास पर्यावरण संतुलनाच्या जनजागृतीसाठी आदर्शवत ठरत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववीपर्यंतचे वर्ग बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत पक्षीसंवर्धन उपक्रम यापुढेही अखंड सुरू राहावा यासाठी शिक्षकांकडून प्रयत्न सुरू आहेत. उपक्रमातून ‘चिऊ चिऊ ये, चारा खा, पाणी पी, भुर्र उडून जा, या बालगीताचे स्मरण होत आहे.
आयएसओ मानांकित कुसुंबीमुरा (ता. जावळी) प्राथमिक शाळेत सातवीपर्यंतचे वर्ग असून, गेल्या महिनाभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू होते. विद्यार्थ्यांकडून शालेय परिसरात झाडांना, कुंपणाला बाटल्या अडकवून त्यात गेल्या महिन्याभरापासून नियमित पाणी व खाद्य घालून पक्षीसंवर्धन केले जात होते. शाळेपासून साधारण एक किलोमीटर अंतर परिसरात बाटल्या लटकवून त्यात येता-जाता पक्ष्यांना पाणी व खाद्य उपलब्ध करून देत पर्यावरणपूरक उपक्रम राबवला जात होता.
पाचवी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांकडून एकेका बाटलीत पाणी व खाद्य घालण्याची जबाबदारी वाटून घेतली होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गुरुवारपासून पुन्हा नववीपर्यंतचे वर्ग बंद झाल्याने पन्नास टक्के शाळेत उपस्थित असणाऱ्या शिक्षकांकडून या उपक्रमाची यशस्वीरित्या राबवणूक होत आहे.
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, झरे, नैसर्गिक स्रोत आटतानाची तसेच शिवारात धान्य रानमेवाही उपलब्ध नसल्याने सद्य स्थितीला परिसरातील अनेकविध, दुर्मीळ पक्ष्यांना पाणी व तांदुळ, ज्वारी, नाचणीचे खाद्य उपलब्ध करण्याच्या उद्देशाने ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी हॉटेल, रस्त्यावर इतरत्र पडलेल्या तसेच विद्यार्थ्यांकडून साधारण चाळीस प्लास्टिक बाटल्या गोळा करत त्या सर्व बाटल्या आडव्या कापून लटकवलेल्या बाटल्यांमध्ये दररोज पाणी व गरजेनुसार खाऊ ठेवला जात आहे. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक विनायक चोरट, रत्नाकर भिलारे, जालंदर सुतार, बाळकृष्ण जाधव आदी शिक्षक परिश्रम घेत आहेत.
गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल, विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख विजयकुमार देशमुख तसेच पालक, ग्रामस्थांतून या अभिनव उपक्रमाचे कौतुक होत आहे.
(कोट)
पर्यावरण समतोल राहावा तसेच पशुपक्ष्यांप्रती, निसर्गाप्रती प्रेम, कृतज्ञता निर्माण व्हावी, या हेतूने पक्षी वाचवा हा उपक्रम राबविण्यात येत होता. गुरुवारपासून शाळा बंद असल्याने इथून पुढे वाढत्या उन्हाच्या झळा पाहता, पक्ष्यांना पाणी व खाद्य कसे उपलब्ध करून देता येईल, याचे सर्व शिक्षकांच्या प्रयत्नातून नियोजन करण्यात आले आहे.
- विनायक चोरट, मुख्याध्यापक, कुसुंबीमुरा, ता. जावळी
(चौकट)
शाळेच्या उपक्रमात ग्रामस्थांच पाठबळ !
आनंददायी अध्ययन, हस्ताक्षर, इंग्रजी भाषण, आदर्श विद्यार्थी, जी तारीख तो पाढा, सामान्यज्ञान, उपस्थिती ध्वज त्याचबरोबर उत्कृष्ट लेझीम पथक, ससाहित्य कवायत, ई-लर्निंग, तंबाखूमुक्त शाळा, शाळा सिध्दी, आयएसओ, स्वच्छ सुंदर नैसर्गिक युक्त सुंदर शाळा, सुंदर बाग, डिजिटल क्लासरूम, यशवंत प्रयोगशाळा, बालवाचनालय, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, पर्यावरणावर आधारित सचित्र शालेय भिंती तसेच मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग मिळत आहे.
०४पेट्री