पक्षी संवर्धन ही लोकचळवळ बनावी : शेखर चरेगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 05:15 PM2018-11-23T17:15:22+5:302018-11-23T17:17:12+5:30
‘संस्कृतीत पक्ष्यांना स्थान आहे, त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी जागृती निर्माण करणे गरजेचे आहे आणि तेच या संमेलनाचे ध्येय असावे. पक्ष्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सक्रिय कार्यकर्ता बनणे गरजेचे आहे.
कºहाड : ‘संस्कृतीत पक्ष्यांना स्थान आहे, त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी जागृती निर्माण करणे गरजेचे आहे आणि तेच या संमेलनाचे ध्येय असावे. पक्ष्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सक्रिय कार्यकर्ता बनणे गरजेचे आहे. प्रचार आणि प्रसारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा. लोकसहभाग वाढवावा. पक्षी संवर्धन ही लोकचळवळ बनावी,’ असे मत सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केले.
येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी पक्षीमित्र संमेलनाचे थाटात उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष किशोर रिटे, डॉ. गिरीश जठार, डॉ. जयंत वडतकर, माजी संमेलनाध्यक्ष दत्ताजी उगावकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी जैवविविधतेचे प्रतीक असलेल्या पृथ्वी आणि वृक्षाला पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.
महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष जयंत वडतकर म्हणाले, ‘पक्ष्यांविषयीची संघटना व संमेलने देशात फक्त महाराष्ट्रामध्येच होतात. महाराष्ट्रात ही संघटना कार्यरत आहे. आजपर्यंत राज्याच्या पाच विभागांत अशी संमेलने झाली आहेत आणि ही संमेलने शासकीय मदतीशिवाय होतात. पक्षी संवर्धनासाठी संघटनेकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. ५ ते १२ नोव्हेंबर यादरम्यान पक्षी सप्ताह साजरा केला जातो. यावर्षीपासून पक्ष्यांच्या संवर्धनाची प्रेरणा देण्यासाठी पक्षीमित्र पुरस्कार देण्यात येणार आहे. या संघटनेमार्फत शेतकरी पक्षीमित्र मेळावा हा अनोखा उपक्रमही सुरू आहे. शहरांमध्ये पक्षी संवर्धनासाठी शहर पक्षी निवडणूक हा उपक्रमही संघटनेने आयोजित केला होता.
दरम्यान, यावेळी सतीश उपळावीकर या चित्रकाराने देशातील सर्व राज्यातील प्रमुख राज्यपक्ष्यांचे रेखाटलेल्या पेंटिंगचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्याबरोबरच पक्ष्यांविषयीच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन झाले. वर्धा ते कºहाड असा साडेआठशे किलोमीटरचा सायकल प्रवास करून पक्षी वाचविण्याचा संदेश देत आलेले किशोर वानखेडे आणि दिलीप वीरकर यांचाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कºहाडला पक्षी अध्ययन केंद्र व्हावे
पश्चिम घाट हा जैवविविधतेने नटलेला आहे. या घाटात हजारो जातींचे पक्षी पाहायला मिळतात. या पक्ष्यांचा अभ्यास होण्यासाठी आणि पक्षी संवर्धनासाठी कºहाडला पक्षी अध्ययन केंद्र व्हावे, असा ठराव या संमेलनात व्हावा, अशी अपेक्षा सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. तसेच त्या अध्ययन केंद्रासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.