मरिआईचीवाडीतील कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:39 AM2021-01-20T04:39:07+5:302021-01-20T04:39:07+5:30
सातारा/लोणंद : खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडीमधील मृत कोंबड्यांचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे ...
सातारा/लोणंद : खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडीमधील मृत कोंबड्यांचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे स्पष्ट झाले. तर हणबरवाडीतील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या मरिआईचीवाडी आणि कºहाड तालुक्यातील हणबरवाडीमधील काही कोंबड्या मृत झाल्या होत्या. या मृत कोंबड्यांचा अहवाल भोपाळ येथून प्राप्त झाला आहे. त्यानुसार मरिआईचीवाडीतील कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपासूनच पशुवैद्यकीय उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बर्ड फ्लूचा फैलाव रोखण्यासाठी बाधित क्षेत्राला केंद्रबिंदूू धरून एक किलोमीटर त्रिज्येच्या परिघातील सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे काम सुरू झाले. या क्षेत्रातील एका पोल्ट्री फार्ममधील २६०० पक्षी व अंडी नष्ट करण्यात आली, तर खाद्य, तूस व गोण्या जाळून टाकण्यात आल्या. तसेच सर्व भागांत सोडियम हायफोक्लोराइडची फवारणी करण्यात आली. मृत कोंबड्यांच्या एक किलोमीटर परिसरातील जवळपास तीन हजार कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने मारण्यात येत आहेत. त्यानंतर या मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावली जात आहे.
दरम्यान, हणबरवाडीतील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण काहीसे कमी झाले आहे.
चौकट :
हिंगणी, बिदालचा अहवाल बाकी...
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. यामधील दोन ठिकाणचा अहवाल प्राप्त झाला, तर माण तालुक्यातील हिंगणी आणि बिदाल येथील मृत कोंबड्यांचा अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.
फोटो दि.१९लोणंद बर्ड फ्लू फोटो नावाने...
फोटो ओळ : खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडीतील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. (छाया : संतोष खरात)
...........................................