सातारा जिल्ह्यास बर्ड फ्लू अद्याप धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:42 AM2021-01-13T05:42:36+5:302021-01-13T05:42:36+5:30

सातारा : सातारा जिल्ह्यात बर्ड फ्लू प्रादुर्भावाचा अद्याप कोणताही धोका नसून, पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. बर्ड फ्लू ...

Bird flu is not yet a threat to Satara district | सातारा जिल्ह्यास बर्ड फ्लू अद्याप धोका नाही

सातारा जिल्ह्यास बर्ड फ्लू अद्याप धोका नाही

Next

सातारा : सातारा जिल्ह्यात बर्ड फ्लू प्रादुर्भावाचा अद्याप कोणताही धोका नसून, पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. बर्ड फ्लू रोगाचे प्रतिबंधात्मक उपाययोजना भाग म्हणून रोग सर्वेक्षण केले जात असून, पशुसंवर्धन विभाग दक्ष राहून कामकाज करीत आहे. तसेच जिल्ह्यात जर कावळे, पोपट, बगळे, वन्य पक्षी किंवा स्थलांतरित पक्षी मरतूक झाल्याचे निदर्शनास आले, तर नागरिकांनी त्वरित माहिती पशुसंवर्धन विभागास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.

परंपरागत भारतीय अन्न उकळून शिजवण्याच्या पद्धतीनुसार कोंबडी मांस व अंडी खाणे हे पूर्णत: सुरक्षित असून, पक्षी व अंडी विक्रीवर कोणतेही निर्बंध लागू नाहीत. त्यामुळे जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरवू नये.

बर्ड फ्लू रोगाचे विषाणू प्रामुख्याने स्थलांतरित पक्षी किंवा अन्य वन्यपक्षी यांमध्ये आढळून येत असल्याने जिल्ह्यामधील सर्व जलाशये, तलाव किंवा पाणवठ्याच्या जागी कोणतीही असाधारण पक्षी मरतूकबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बर्ड फ्लू रोगाचा संभाव्य धोका ओळखून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. प्राण्यांमधील सांसर्गिक व संक्रामक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये बँकयार्ड पोल्ट्री किंवा कोणत्याही व्यावसायिक पोल्ट्रीमध्ये जर मोठ्या प्रमाणात पक्षांमध्ये मरतूक आढळून आली तर जबाबदार नागरिक किंवा व्यावसायिक या नात्याने तशी माहिती त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला देणे बंधनकारक आहे. पक्ष्यांमधील कोणत्याही असाधारण मरतूक लपवण्यात येऊ नये. तशी सूचना संबंधित पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती तथा तालुका नोडल अधिकारी यांनाही तातडीने देण्यात यावी, म्हणजे प्रशासनास वेळीच योग्य ती कार्यवाही करणे सोयीचे होईल.

जिल्ह्यामध्ये १९ व्या पशुगणनेनुसार ३९ लाख ७९ हजार ६११ इतकी कुक्कुट पक्षी संख्या आहे. आजमितीला नव्याने मोठ्या प्रमाणात देशी पक्षी संगोपन, ब्रॉयलर संगोपन, लेअर पक्षी संगोपनाचे व्यवसायात वाढ झालेली असून, सर्व पोल्ट्री व्यावसायिकांनी त्यांचे पक्षी फार्ममध्ये जैव सुरक्षा नियमांचे कोटेकोरपणे पालन करून पक्ष्याच्या आरोग्याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यामधील जे व्यावसायिक पाच हजार पेक्षा जास्त पक्ष्यांचे संगोपन करत आहेत किंवा ५०० पेक्षा जास्त क्षमतेचे अंडी उबवणूक यंत्राद्वारे पिल्ली निर्मिती करीत आहे, त्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे, असेही जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. परिहार यांनी कळविले आहे.

Web Title: Bird flu is not yet a threat to Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.