घरगुती उद्यानातून होतेय पक्षी संवर्धन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:39 AM2021-01-25T04:39:33+5:302021-01-25T04:39:33+5:30
खंडाळा : उष्णतेचा उच्चांक आणि पाणीटंचाई यामुळे उन्हाळा नेहमीच त्रासाचा ठरत असतो. वाढत्या उन्हाचा चटका माणसाप्रमाणे पक्ष्यांना ...
खंडाळा : उष्णतेचा उच्चांक आणि पाणीटंचाई यामुळे उन्हाळा नेहमीच त्रासाचा ठरत असतो. वाढत्या उन्हाचा चटका माणसाप्रमाणे पक्ष्यांना बसत असतो. आगामी उन्हाळयात मानवाप्रमाणे त्याचेही स्वर कोरडे पडू नयेत. यासाठी पक्ष्यांच्या संवर्धनासाठी खंडाळ्यातील निसर्गप्रेमी रवी पवार यांनी आपल्या घराच्या परिसरातच पक्षी उद्यान उभारले आहे. त्यामुळे शेकडो पक्ष्यांचे जीवनमान सुखकर झाले आहे.
झाडांमध्ये घरटे करून राहणाऱ्या पक्ष्यांचा मधुर आवाज ही पक्ष्यांची खरी ओळख, त्याच्या मधुर आवाजाला आपली नजर नेहमी शोधत असते. रखरखत्या उन्हाने त्यांचा जीव कासावीस होत असतो, परिणामी पक्ष्यांचे जीवन धोक्यात येऊ लागले आहे. उन्हामुळे पक्ष्यांचे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन, बरेच पक्षी उडताना खाली पडल्याचे पाहायला मिळते. काही उष्माघाताने दगावल्याचे दिसून येते. माणूस त्याच्या गरजा अत्याधुनिक सोयी-सुविधांनी तत्काळ पूर्ण करू शकतो; पण या पक्ष्यांचे काय? पक्ष्यांना नैसर्गिक स्त्रोतांतून गरज पूर्ण करावी लागते. त्यामुळे त्यांना अडचणी निर्माण होतात. काही पक्षी अंघोळ करून, तर काही पक्षी पाणी पिऊन शरीराचे तापमान नियंत्रित ठेवतात. हेच पक्षी कीटक, उपद्रवी प्राण्यांवर नियंत्रण तसेच सफाई कामगार आणि बीजप्रसाराचे महत्त्वाचे काम करत असतात. पक्षी हा निसर्गाचा सौंदर्याचा दागिना आहे.
त्याच्या मदतीसाठी येणाऱ्या उन्हाळ्यात पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून या अवलियाने त्याच्या घराच्या परिसरात व स्वतःच्या इमारतीवर सावलीमध्ये त्यांच्या रहिवासाची सोय करून मातीच्या भांड्यामधे पाणी ठेवले आहे. ते पाणी स्वच्छ आणि ठराविक वेळेने बदलले जाते. घराच्या परिसराजवळ आणि बागेत शक्य असेल तिथे कृत्रिम घरटी निर्माण करून खाद्यपदार्थही ठेवण्याची सोय केली आहे. रोज सकाळी शिंजिर, राखी वटवट्या, शिंपी, भांग पाडी मैना, बुलबुल, कोकिळा, चिमणी, टोपीवाला, दयाळ, चष्मेवाला यांसह अनेक प्रकारचे शेकडो पक्षी पाणी पिण्यासाठी आणि बागेत आपले कुटुंब सगोपनासाठी येतात.
कोट..
घराजवळ असणाऱ्या छोट्याशा बागेमध्ये नेहमी काही तरी नवीन पक्ष्यांसाठी करावे, म्हणून मन खटपटत असते. कानाला पक्ष्यांचा आवाज नाही आला, तर मन कासावीस होते. डोळ्यांना पक्षी दिसले नाहीत, तर सुंदर दिवसाची सुरुवात होत नाही.
यंदा उन्हाळ्याची तीव्रता जास्त जाणवण्याची शक्यता असल्याने पक्ष्यांची किलबिलाट अबाधित राहावी, यासाठी कृत्रिम घरटे आणि पाण्याची सोय बागेमध्ये ठीकठिकाणी केली. आपल्या परिसरात सर्वांनी ते करायला हवे, यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर करावा. कारण पाणी थंड राहते. भांडे उथळ असावे. खोल भांड्यात लहान पक्षी बुडण्याची भीती असते.
- रवी पवार, निसर्ग मित्र खंडाळा
........................................
फोटो मेल केले आहेत .