‘जानदार..शानदार..आणि सगळ्यात इमानदार', शुभेच्छांचे फ्लेक्स लावत साजरा केला कुत्र्याचा वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 12:50 PM2018-04-03T12:50:43+5:302018-04-03T12:54:40+5:30
कुत्र्याच्या वाढदिनी फ्लेक्स, केक अन् फटाके !....भर चौकातील अनोखी ‘सातारी त-हा’ पाहण्यासाठी लोकांची गर्दी
सातारा : एकीकडे सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापल्याबद्दल कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मोहीम सातारा पोलिसांनी तीव्र केली असतानाच दुसरीकडे भर चौकात भला मोठा फ्लेक्स लावून, केक कापून अन् फटाके उडवून लाडक्या पाळीव कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्याची घटना करंजे परिसरात घडली. विशेष म्हणजे, 'लकी'चा वाढदिवस साजरा करण्यासाठी पोलिसांचीही परवानगी घेण्यात आली.
सातारकर तसे खूप हौशी. त्यांच्या ‘सातारी त-हा’ही हटकेच. ते कधी काय करतील, सांगता येत नाही. करंजे परिसरातील राजेंद्र कुंभार यांच्या ‘लकी’ नावाच्या रॉटव्हिलर पाळीव कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सोमवारी (2 एप्रिल) रात्री बाबर चौक परिसरातील नागरिक एकत्र जमले. चौकातील भल्या मोठ्या फ्लेक्सवर ‘लकी’चा फोटो लावण्यात आला. त्यावर ‘जानदार..शानदार..आणि सगळ्यात इमानदार आमच्या लकीला सातव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ असा मजूकरही दिसत होता. विशेष म्हणजे त्याला शुभेच्छा देणा-या मित्र परिवाराचाही खाली उल्लेख करण्यात आला होता.
येथील चौकात लकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणण्यात आला. लकीला केक भरवण्यात आल्यानंतर रस्त्यावर जोरदार फटाकेबाजी करण्यात आली. ‘लकी’चा हा सातवा वाढदिवस साजरा होत असताना उपस्थित मंडळींनीही मोठ्या कौतुकाने टाळ्या पिटल्या.
'गेल्या सात वर्षांपासून लेकीचा वाढदिवस आम्ही थाटात साजरा करतो. दोन-तीन वर्षे आम्ही फ्लेक्स लावले होते. मात्र एका रात्रीत काही जणांनी ते चोरून नेले होते. त्याचे कारण काही कळाले नाही. मात्र यंदा चौकात स्ट्रीटलाईट असल्यामुळे आणि आमचे कार्यकर्ते जागत असल्यामुळे फ्लेक्सला धक्का लागला नाही,' अशी माहिती 'लकी'चे मालक राजेंद्र कुंभार यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
दरम्यान, हजारो रुपये खर्चून कुत्र्याचा वाढदिवस सार्वजनिक स्थळी जोरात साजरा करण्याच्या या ‘सातारी त-हा’ची मंगळवारी दिवसभर साता-यात चर्चा सुरू होती.