‘बर्थ डे’ असुद्या भावाचा; जल्लोष नाय करायचा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:44 AM2021-09-15T04:44:51+5:302021-09-15T04:44:51+5:30
कऱ्हाड : रस्त्यात वाढदिवस साजरा करणाऱ्या एका ‘भावाला’ दोन दिवसांपूर्वी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याची ‘वारी’ करावी लागली. त्याला ...
कऱ्हाड : रस्त्यात वाढदिवस साजरा करणाऱ्या एका ‘भावाला’ दोन दिवसांपूर्वी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याची ‘वारी’ करावी लागली. त्याला केलेल्या कृत्याची हात जोडून क्षमाही मागावी लागली. माणुसकीच्या भावनेतून पोलिसांनी त्याचे ‘रेकॉर्ड’ रंगवले नाही; पण रस्त्यात वाढदिवस करणे कायद्याने गुन्हा आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी.
वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण. दरवर्षीचा वाढदिवस जंगी स्वरूपात साजरा व्हावा, असा अनेकांचा प्रयत्न असतो. ‘बर्थ डे’ असलेल्या व्यक्तीपेक्षा त्याचे मित्र अथवा नातेवाईक त्यासाठीचे नियोजन करतात. मात्र, हे नियोजन करताना अनेकवेळा सामाजिक शांततेचा भंग होतो. कऱ्हाड, मलकापूर, विद्यानगर, सैदापूर, ओगलेवाडी, नांदलापूर, वारूंजी परिसरात हे प्रस्थ मोठ्या प्रमाणात आहे. लहान आणि ज्येष्ठांपेक्षा युवावर्गामध्ये वाढदिवसाच्या ‘सेलिब्रेशन’ची मोठी ‘क्रेझ’ असते. वाढदिवसाच्या काही दिवस अगोदर शुभेच्छांचे फलक उभारण्यापासून वाढदिवसाच्या रात्री बारा वाजता फटाके फोडण्यापर्यंतचे नियोजन अनेकवेळा होते. तसेच वाढदिवसाचे फलक लावण्याचा उद्योगही बिनबोभाट केला जातो. तसेच रात्री बारा वाजता फटाके वाजवून रस्त्यावर केक कापण्याचे नवे ‘फॅड’ही आले आहे.
रस्त्यात केला जाणारा हा वाढदिवस कायदेशिरदृष्ट्या गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी दंडाची तरतूद असून, कऱ्हाड शहर पोलिसांनी असे वाढदिवस करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी असाच वाढदिवस साजरा करणाऱ्या ‘बर्थ डे बॉय’ला पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’, या उक्तीप्रमाणे इतर युवकांनी यातून बोध घेणे गरजेचे आहे.
- चौकट
कऱ्हाडातील कारवाई
वर्ष : कारवाई : युवक
२०२० : ४ : १८
२०२१ : ६ : २६
- चौकट (फोटो : १४केआरडी०३)
कायदा काय सांगतो..?
१) रस्त्यात वाढदिवस म्हणजे सार्वजनिक ठिकाणी असभ्य, त्रासदायक वर्तन
२) मुंबई पोलीस कायदा कलम ११०, ११२ अन्वये हा गुन्हा ठरतो.
३) त्यासाठी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून समज
४) अथवा न्यायालयात हजर करून दंड अशी कारवाई होते.
- चौकट
‘बर्थ डे’ भावाचा; पण त्रास गावाला!
१) रस्त्यावर वाहन उभे करून त्यावर केक कापायचा.
२) केक कापण्यासाठी तलवारीचा वापर करायचा.
४) आरडाओरडा करून गोंधळ घालायचा.
५) मोठ्या आवाजात गाणी लावून धिंगाणा करायचा.
६) मध्यरात्री फटाके फोडून जल्लोष करायचा.
- चौकट
भैय्या, नेते, अध्यक्ष अन् बरंच काही...
वाढदिवसानिमित्त वारंवार फलक लावले जातात. या फलकावर ‘दादा’, ‘भाई’, ‘भैय्या’, ‘बंधू’, ‘भाऊ’, ‘नेते’, ‘अध्यक्ष’ अशी एक ना अनेक विशेषणे देऊन फोटो छापले जातात. फलक लावणाऱ्यांना त्यातून समाधान मिळत असले, तरी त्या फलकांमुळे शहराला ओंगळवाणे रूप येते.
- कोट
रस्त्यावर वाढदिवस करणारे हुल्लडबाज अनेकदा दहशत निर्माण करतात. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस सज्ज असून, जर रस्त्यात कुणी वाढदिवस करीत असेल तर, पोलिसांना माहिती द्यावी. जे माहिती देतील, त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
- बी. आर. पाटील
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कऱ्हाड
- चौकट
...तर आशीर्वाद मिळतील का?
वाढदिनी थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. किंबहुना ती आपली संस्कृती आहे. मात्र, रात्री बारा वाजता रस्त्यात फटाके फोडले, धिंगाणा घातला, आरडाओरडा केला, तर आशीर्वाद मिळतील की शिव्या, याचाही विचार तरुणांनी करणे गरजेचे आहे.
फोटो : १४केआरडी०३
कॅप्शन : प्रतिकात्मक