काळी बाहुली बांधून झाडावर घाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:31 AM2018-06-22T00:31:50+5:302018-06-22T00:31:50+5:30
सातारा : पुण्यातील ‘अंघोळीची गोळी’ संस्थेने साताऱ्यात येऊन झाडांना खिळेमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. तर त्याचवेळी दुसरीकडे अजिंक्यतारा किल्ल्याच्या मार्गावर झाडाच्या बुंधक्याला काळी बाहुली बांधून कुºहाडीचे घाव घातल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे.
सातारा अजिंक्यतारा, यवतेश्वरच्या कुशीत वसलेला आहे. या डोंगरावर गर्द झाडी लाभली आहे. त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील दुर्मीळ प्राणी, पशुपक्षी या डोंगरात पाहायला मिळतात. यामुळे हा परिसर नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध म्हणून ओळखला जातो. अजिंक्यतारा, कास पठार, सज्जनगड पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातून पर्यटक, भाविक येतात. अन् येथील निसर्गसंपन्न परिसर पाहून पुन्हा येण्याचा संकल्प करतात.
या निसर्गावर विघ्नसंतोषी मंडळींची वक्रदृष्टी अधूनमधून पडत असते. या डोंगरात जनावरे राखायला जाणाºयांकडून वाळलेले गवत पेटवण्याचे प्रकार वारंवार घडतात. अख्खा डोंगर वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडतो. दुर्मीळ वनस्पती जळून जाते. असंख्य पशुपक्षी मृत्युमुखी पडतात.
हे कमी म्हणून की काय अजिंक्यतारा किल्ल्याच्या डोंगरात अनोखा प्रकार उघडकीस आला. चारभिंतीपासून मंगळाई देवीच्या मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर झाडी वाढलेली आहे. त्यातील एका झाडाच्या बुंधक्याला काळी बाहुली बांधलेली असून, त्यावर कुºहाडीने घाव घालण्यात आले आहेत. या घावामुळे निम्म्यातून झाड पडलेले आहे.
वाई तालुक्यातील मांढरगडावरही झाडांना काळ्या बाहुल्या बांधल्या जात होत्या. पण आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राजधानीत चक्क झाडाला काळी बाहुली बांधून कुºहाड चालविण्याचा प्रकार घडला आहे. डोंगरावर फिरायला जाणाºया मंडळींना हा प्रकार दिसला. या प्रकारामुळे सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत वेळीच मार्ग काढण्याची मागणी होत आहे.
सर्व लाकडं जागेवर
जंगलात अनेकदा जळणासाठी झाड तोडली जातात; पण अजिंक्यतारा किल्ल्याच्या मार्गावर कुºहाडीने झाड तोडले असताना एकही लाकूड हलविलेले नाही. त्यामुळे या प्रकारामुळे संशय व्यक्त होत आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाºया पद्धतीवरच घाव घालण्याची मागणी होत आहे.