कराडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा सातजणांना चावा; जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 01:47 PM2020-01-24T13:47:50+5:302020-01-24T13:48:58+5:30
कराड शहरात वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेचा शुक्रवारी पुन्हा प्रत्यय आला.
कराड: कराड शहरात वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेचा शुक्रवारी पुन्हा प्रत्यय आला. येथील प्रभाग क्रमांक तेरामधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरात एका पिसाळलेल्या श्वानाने सकाळच्या सुमारास सातजणांचा चावा घेतला. यामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कराड शहरात सध्या मोकाट कुत्र्यांच संख्या वाढली आहे. अनेकवेळा पहाटेच्यावेळी व्यायामासाठी फिरणाऱ्या नागरिकांवर हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. शुक्रवारी सकाळी शहरातील प्रभाग क्रमांक तेरामधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरात उत्तरेश्वर वाघमारे, वंदना कृष्णा लोंढे, अनिल नागाप्पा कट्टीमणी, उमेश कोळी, जोत्स्ना जागीरदार, जमीर मुल्ला, महेश कोळी यांच्यावर अचानक पिसाळलेल्या श्वानाने हल्ला केला. या हल्ल्यात उत्तरेश्वर वाघमारे या मुलाच्या डोक्याला व गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.