महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी, पर्यटक लुटतायत थंडीचा आनंद
By नितीन काळेल | Published: December 16, 2023 06:20 PM2023-12-16T18:20:47+5:302023-12-16T18:21:10+5:30
सातारा : वातावरणातील बदलामुळे थंडीत वाढ झाली असून सातारा शहराचा पारा शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी १३ अंशाजवळ होता. जागतिक ...
सातारा : वातावरणातील बदलामुळे थंडीत वाढ झाली असून सातारा शहराचा पारा शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी १३ अंशाजवळ होता. जागतिक पर्यटनस्थळ आणि थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरमध्येही कुल-कुल वातावरण आहे. पर्यटक थंडीचा आनंद लुटत आहेत. मात्र, गतवर्षीपेक्षा महाबळेश्वरला थंडी कमीच असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात यावर्षी दीड महिना उशिराने कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. नेहमी नोव्हेंबरपासून गुलाबी थंडीची चाहूल लागते. पण, यंदा पर्जन्यमान कमी झाले. त्याचप्रमाणेच थंडीचीही स्थिती आहे. यामुळे यंदा सातारा जिल्हावासीयांना कडाक्याच्या थंडीचा अनुभव येणार का, अशी शंका होती. पण, गेल्या पाच दिवसांतील वातावरण बदलाने थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. यामुळे उशिरा का असेना हिवाळा ऋतू सुरू असल्याचे अनुभवयास मिळत आहे.
सातारा शहराचे किमान तापमान गेल्या चार-पाच दिवसांपर्यंत तरी १५ ते २० अंशापर्यंत कायम असायचे. त्यातच अनेकवेळा ढगाळ हवामान तयार होत होते. यामुळे सातारकरांना थंडी जाणवत नव्हती. पण, दोन दिवसांपासून साताऱ्याचा पारा १३ अंशापर्यंत खाली घसरला आहे. शुक्रवारी १३.२ अंश तापमान होते. तर, शनिवारी १३.५ अंशाची नोंद झाली. त्यामुळे दोन दिवसांपासून पारा १३ अंशाजवळ असल्याने सातारकर चांगलेच गारठल्याचे दिसून आले. यामुळे माॅर्निंग वाॅकवरही परिणाम झालेला आहे. तर, बहुतांशी नागरिक हे उबदार कपडे घालूनच बाहेर पडत आहेत.
जिल्ह्याचा ग्रामीण भागही गारठला आहे. तेथील पाराही १२ ते १३ अंशाच्या दरम्यान आहे. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. त्यातच विजेच्या वेळापत्रकाप्रमाणे थंडीच्या कडाक्यातही शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीही घराबाहेर पडावे लागते. सध्याची थंडी पिकांना मानवणारी असली तरी अधिक तीव्रता वाढल्यास फळबागांना धोका निर्माण होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
महाबळेश्वरही कुल-कुल...
जागतिक पर्यटनस्थळ आणि थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरमध्येही तीन दिवसांपासून कुल-कुल वातावरण आहे. बुधवारपासून पारा १५ अंशाच्या खाली आहे. शुक्रवारी १२.५ अंशापर्यंत तापमान खाली आले होते. शनिवारी वाढून १३.३ अंश नोंद झाले. तरीही महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी आहे. या थंडीचा आनंद पर्यटक लुटत आहेत. तरीही महाबळेश्वरला गतवर्षीपेक्षा थंडी कमीच असल्याचे दिसून येत आहे.